बँकेवर प्रशासक नेमण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे सन 2006 ते 2021 पर्यंत असणारे संचालक मंडळे, मुख्यकार्यकारी आधिकारी व त्यास मदत करणारे अधिकारी कर्मचारी या आर्थिक नुकसाणीस जबाबदार असल्याचा ठपका ठेवत दोषी आढळले असल्याचा चौकशी अहवाल नाशिक विभागीय सहनिबंधक राजेंद्र शाह यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना दिला आहे.
बँकेच्या अधिकारींनी बँकेचे कर्ज वसूल करताना नियमबाह्य ओटीएस सवलत देणे, अपारदर्शक लिलाव प्रक्रिया राबवणे, अयोग्य दराने सर चार्ज आकारणे, न्यायालयीन खर्चासाठी अवाढव्य वकील फी बँकेत टाकणे, म्युच्युअल फंडात बेकायदेशीर गुंतवणूक करत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान करणे, शासकीय रकमेचा अपहार करणार्या कर्जत शाखाअधिकारी सदाशिव फरांडे यास निलंबित न करता त्याला पाठीशी घातल्याने संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला आहे. नियमबाह्य कार्यपध्दतीने नातेवाईकांची भरती करून सेवेत घेणे, बँकेवर आपलीच सत्ता कायम राहण्यासाठी नियमबाह्य नातेवाईकांना सभासद करणे, गुन्हे दाखल झालेल्या कर्मचार्यांना नियमबाह्य अॅडव्हान्स देणे, जादा अवास्तव वसुली खर्च टाकणे, फर्निचर व शाखा नूतनीकरण खर्च करताना पारदर्शकपणे न करणे, कर्ज वाटप करताना कमी मूल्यांकन तारण घेऊन जादा रक्कम कर्ज वाटप करणे, आधिकारी यांनी बँक निधीचा दुरोपयोग करत व कर्जाची सुरक्षितता न पाहता कर्ज वाटप करुन बँकेच्या हिताला बाधा आणली आहे. तसेच संचालकांनी बेजबाबदारीने, कर्तव्यात कुसुर करणे, निष्काळजीपणे कारभार करत बँकेचे आर्थिक नुकसान केले असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील चेअरमन, संचालक, मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे व संबंधित भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांनी बँकेत नियमबाह्य कामकाज करून बँकेत भ्रष्टाचार केल्याची तक्रार जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्यासह सभासद कॅप्टन विट्ठल वराळ, बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी, मारुती पोटघन, विक्रमसिह कळमकर यांनी केली होती. त्यामुळे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तात्काळ दखल घेत नाशिक विभागीय सहनिबंधक राजेंद्र शाह यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार शाह यांनी व त्यांच्या पथकाने तपासणी केली असता सन 2006 ते 2021 कालावधीतील संचालक मंडळ नमुनादाखल मुद्द्यावर दोषी आढळले आहे.
या अहवालात मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे यांनी नियमबाह्य कामकाज केले आहे. तर संचालक मंडळाने कर्तव्यात सतत हेतुपूर्वक कसूर, निष्काळजीपणा करत कोट्यावधी रुपयांचे बँकेचे नुकसान केले आहे. बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे यांच्यासह शाखा व्यवस्थापकानांही लेखापरीक्षण अहवालात दोषी ठरवण्यात आले आहे.
प्रशासक लावण्याची मागणी!
सैनिक बँकेतील घोटाळयाची विभागीय सहनिबंधक यांनी चौकशी केली असता जवळ जवळ पाच कोटी रक्कम तीन संचालक मंडळाकडून व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडून वसूल पात्र निघणार आहे. पूर्ण सखोल लेखापरीक्षण केल्यास चाळीस कोटींपेक्षा जादा रक्कम वसूल पात्र निघणार आहे. त्यामुळे सभासदांना गेली 20 वर्षांपासून लाभांश रक्कम वाटप न करता हडप केली आहे. त्यामुळे त्वरित हे संचालक मंडळ बरखास्त करावे व प्रशासक मंडळ सहकार आयुक्तांनी नियुक्त करण्याची मागणी बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी यांनी केली आहे.