पुतण्याच्या लग्नात क्रीडा शिक्षकाचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर(प्रतिनिधी)- पुतण्याच्या लग्नात क्रीडा शिक्षकाने सत्कार समारंभाला फाटा देऊन मठ, मंदिराचे जीर्णोध्दार व कुस्ती हगाम्यासाठी एकूण 27 हजार रुपयांची देणगी दिली. निमगाव वाघा (ता. नगर) येथील अर्जुन दशरथ पवार यांचे चिरंजीव किरण व हमिदपूर (ता. नगर) येथील पाराजी बाळासाहेब कांडेकर यांची मुलगी श्रध्दा यांचा विवाह निमगाव वाघा येथील न्यू मिलन मंगल कार्यालयात नुकताच संपन्न झाला. यामध्ये सत्कार समारंभाला फाटा देऊन पुतण्याच्या लग्नात नवनाथ विद्यालयाचे क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार यांनी पंढरपूर येथील वैकुंठवासी विठ्ठलबाबा देशमुख महाराज यांच्या नावाने बांधण्यात येणार्या मठासाठी 11 हजार रुपये, निमगाव वाघा येथील हनुमान मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी 11 हजार रुपये व यात्रेनिमित्त कुस्ती हगाम्यासाठी 5 हजार रुपये अशी एकूण 27 हजार रुपयांची देणगी दिली.
जिल्हा बँकेचे माजी संचालक रावसाहेब पाटील शेळके व जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे, अरुण फलके व ग्रामपंचायत सदस्य तथा नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्याकडे सदर देणगी देण्यात आली. यावेळी ह.भ.प. यशवंत महाराज थोरात, योगेश महाराज शिंदे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, मुख्याध्यापक किसन वाबळे, गोकुळ जाधव, अशोक बाबर, काशीनाथ पळसकर, उद्योजक बाळासाहेब शहाणे, उत्तम कांडेकर, भागचंद जाधव, राजेंद्र पवार, भरत फलके आदी उपस्थित होते.