डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम
विवाह सोहळे, वाढदिवस, सण-उत्सव वृक्षरोपणाने साजरे करुन पर्यावरणाचा समतोल साधला जाणार -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- लग्न सोहळ्यात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन नवदांम्पत्यांना वैवाहिक जीवनाची सुरुवात करताना वृक्षरोपणासाठी रोपांचे आहेर भेट देण्यात आले. वृक्षरोपण व संवर्धनाचे कार्य करणारे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
लग्न म्हंटल की, विधी, पूजा, मंगलाष्टके व सप्तपदींचा सोहळा या सोहळ्यात संस्थेच्या पुढाकाराने वृक्षरोपण करण्याचे कार्य केले जात आहे. नुकतेच जयसिंग धोंडीभाऊ बोडखे यांचे चिरंजीव आदिनाथ (रा. निमगाव वाघा) व साहेबराव देवराम तरटे (रा. भाळवणी) यांची कन्या असावरी यांचा विवाह भाळवणी (ता. पारनेर) येथे थाटात पार पडला. या विवाहात डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य वृक्षमित्र पै. नाना डोंगरे यांनी नवदांम्पत्यांना रोप देऊन वैवाहिक जीवनास शुभेच्छा दिल्या. यावेळी ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी), किसन वाबळे, भागचंद जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, काशीनाथ पळसकर, ह.भ.प. भाऊसाहेब जाधव, एकनाथ डोंगरे, गोरख तरटे, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, वाढत्या शहरीकरणामुळे झांडांची कत्तल, निसर्गाचा ढासाळलेला समतोल यामुळे दुष्काळासह अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटांचा सामना सर्वांना करावा लागत आहे. पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असून, विवाह सोहळे, वाढदिवस, सण-उत्सव वृक्षरोपणाने साजरे करुन त्या वृक्षाचे संवर्धन केल्यास पर्यावरणाचा समतोल साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे यांनी वधूवरांनी विवाहानिमित्त एक झाड लावून वाढवले तर संसाराप्रमाणे ते वृक्ष देखील बहरणार आहे. वैवाहिक जीवनात सोबत एक झाड वाढवण्याचा संकल्प सर्वांनी केला तर अनेक झाडे आपण वाढू शकतो या हेतूने डोंगरे संस्थेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.