पालक-शिक्षक मेळाव्यात स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
भविष्यात स्पर्धा परीक्षांना महत्त्व -ज्ञानदेव पांडूळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक मेळावा उत्साहात पार पडला. कोरोना काळात ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरु झाले असून, या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी व शैक्षणिक कामकाजाच्या सुसूत्रतेसाठी ध्येय-धोरण ठरविण्यात आले. तर मागील शैक्षणिक वर्षातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
पालक-शिक्षक मेळाव्याची सुरुवात कर्मवीर भाऊराव व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने झाली. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास रयत समन्वय समितीचे अशोक बाबर, ज्ञानदेव पांडूळे, माध्यमिकचे मुख्याध्यापक एस.एल. ठुबे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, प्रा. विश्वासराव काळे, कैलास मोहिते, शामराव व्यवहारे, ठाणगे, ज्योती मोकळ आदी उपस्थित होते.
जेष्ठ शिक्षक महादेव भद्रे यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित पालकांमधून पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन व विकास समितीसाठी सदस्यांची निवड करण्यात आली. विज्ञान शिक्षक प्रशांत खंडागळे यांनी विद्यालयातून गुणवत्ता प्रकल्पाद्वारे जिल्हा, राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी सादर केली. सहशिक्षक प्रदीप पालवे यांनी विद्यालयात गुणवत्ता कक्षाद्वारे राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सहशिक्षिका रोहिणी झावरे यांनी सर्व प्रकारच्या शासकीय शिष्यवृत्तीसाठी विद्यालयाकडून प्रस्ताव वेळेत सादर करण्यासाठी पालकांनी तत्पर राहण्याविषयी आवाहन केले. पाल्याच्या नियमित उपस्थितीसह त्यांच्या नित्य सवयी, आरोग्य, शैक्षणिक अडचणी यांकडे वेळोवेळी लक्ष पुरवून शालेय प्रशासनास सहकार्य करण्याच्या सूचना मांडल्या.
ज्ञानदेव पांडूळे म्हणाले की, भविष्यात स्पर्धा परीक्षांना महत्त्व प्राप्त होणार आहे. यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्याची गरज आहे. स्पर्धेशिवाय आपली गुणवत्ता कळत नाही. यासाठी पालकांनी आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेत उतरविण्याची गरज आहे. पालकांनी शालेय स्तरावर पाल्यांच्या गुणात्मक विकासासाठी शालेय प्रशासनासोबत नियमित समन्वय साधण्याचे त्यांनी आवाहन केले.
मुख्याध्यापक एस.एल. ठुबे यांनी विद्यार्थांच्या सर्वांगीन प्रगतीसाठी शिक्षक व पालकांचा समन्वय आवश्यक असून, शिक्षक-पालक संघाच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडवून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात शिक्षक-पालक संघाच्या नवनियुक्त सदस्यांसह विविध स्पर्धा परीक्षांत नैपुण्यपूर्ण कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते झाला. सहशिक्षिका निलिमा कातोरे यांनी माता पालक संघ, तर उमेश विलायते यांनी उपस्थित पालकांमधून शाळा व्यवस्थापन व विकास समिती कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले. आभार महादेव भद्रे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जालिंदर सिनारे, अमित धामणे, तारकेश्वरी आढाव, राजेंद्र देवकर, वर्षा धामणे, प्रभाकर थोरात, राजश्री नागपुरे, संजय भिंगारदिवे आदी शालेय शिक्षकांनी परिश्रम घेतले.