• Thu. Dec 12th, 2024

रोजी-रोटी हिरावणार्‍या त्या डॉक्टरच्या हॉस्पिटल समोर महिलेचे मुला-बाळांसह उपोषण

ByMirror

Jun 23, 2022

चौदा वर्षापासून महापालिकेच्या जागेत लावलेली हातगाडी पुन्हा लावू देण्याची मागणी

हातगाडी लावणार्‍या महिलेला हटवून महापालिकेच्या जागेत त्या हॉस्पिटलनले लावले बाकडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर बस स्टॅण्ड समोरील एका मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टराने पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम पुढे करुन महापालिकेच्या जागेत चौदा वर्षापासून चहा व नाष्ट्याची हातगाडी लावणार्‍या महिलेस हटविल्याने महिलेच्या कुटुंबीयांवर उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे. सदर महिलेने रोजी-रोटीसाठी सदर जागेवर व्यवसायासाठी पुन्हा हातगाडी लावू देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.23 जून) हॉस्पिटल समोर मुला-बाळांसह उपोषण केले.


व्हिक्टोरिया फ्रान्सिस जॉर्ज ही महिला मागील चौदा वर्षापासून तारकपूर समोरील एका मोठ्या खासगी हॉस्पिटल समोर महापालिकेच्या जागेत चहा व नाष्टा सेंटरची गाडी लावून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत होती. कर रुपाने ती महापालिकेची पावती देखील फाडत असे. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखिची असून, त्यांचा उदरनिर्वाह त्या हातगाडीवर विसंबून होता. मात्र खासगी हॉस्पिटलच्या त्या डॉक्टरने गोड बोलून पेव्हिंग ब्लॉकचे काम झाल्यानंतर पुन्हा हातगाडी लावण्याचे सांगितल्याने सदर महिलेने आपली हातगाडी हटवली. काम पूर्ण झाल्यावर सदर महिलेला त्या जागेत हातगाडी लावण्यास मज्जाव करण्यात आला. महिलेला हातगाडी लावण्यात येणार नाही, अशा पध्दतीने पेव्हिंग ब्लॉक लावून कंम्पाऊंड टाकण्यात आले आहे. त्या महिलेला हटवून महापालिकेच्या जागेत त्या हॉस्पिटलनेच बाकडे लावून खासगी बाऊन्सरद्वारे महिलेला सदर जागेत येण्यापासून प्रतिबंध केला आहे.


डॉक्टरांना अनेकवेळा विनंती करुन देखील ते महिलेला हातगाडी लावण्यास विरोध केला जात आहे. यामुळे महिलेच्या मुला-बाळांचे शिक्षणासह उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला असून, सदर महिला तेथे गेल्यास तिला दमदाटी करुन हाकलून लावण्यात येत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. तब्बल दहा महिन्यापासून हातगाडी लावू न दिल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, सदर महिलेने गाडी पुन्हा लावण्यास सहकार्य करण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *