• Wed. Dec 11th, 2024

रिमझिम पावसामध्ये हुतात्मा स्मारकात कारगिल विजय दिवस साजरा

ByMirror

Jul 27, 2022

मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व पुष्पचक्र अर्पण करुन शूरवीरांना अभिवादन

भारत माता की जय…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी परिसर दणाणला

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्तीच्या गीतांनी प्रफुल्लीत झालेले वातवरण, संध्याकाळी झालेल्या रिमझिम पाऊसात शहरातील हुतात्मा स्मारकात मंगळवारी (दि.26 जुलै) कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. भारत माता की जय…, वंदे मातरम…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला. लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब ऑफ अहमदनगर, मराठी पत्रकार परिषद, रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळा व युवानच्या वतीने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, लायन्स क्लबच्या अध्यक्षा सिमरनकौर वधवा, सचिव प्रणिता भंडारी, प्राचार्य एस.एल. ठुबे, एल अ‍ॅण्ड टीचे अरविंद पारगावकर, विभाग अध्यक्ष आनंद बोरा, युवानचे संदीप कुसळकर, लिओचे अध्यक्ष हरमनकौर वधवा, सचिव अनाया बोरा, आंचल कंत्रोड आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


प्रास्ताविकात सिमरनकौर वधवा यांनी प्रत्येक नागरिक व युवकांनी मनात देशभक्ती प्रज्वलित ठेऊन जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ते अविरतपणे करत असलेल्या देश रक्षणाच्या कार्याने देशातील जनता सुखी जीवन जगत असून, देशासाठी शहीद झालेल्या जवानांबद्दल अभिमान बाळगणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मी भाऊराव पाटील संचलित जिजामाता कन्या निवास (वस्तीगृह) मधील विद्यार्थिनींनी देशभक्तीवर गीते सादर केली. शाळेतील विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून जवानांप्रती आदरांजली वाहिली. तर लिओ क्लबच्या सदस्यांनी जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे पथनाट्य सादर केले. प्रारंभी शालेय विद्यार्थी व लिओच्या सदस्यांनी हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबविले.


पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी म्हणाल्या की, देश रक्षणासाठी जवानांनी दिलेले बलिदान न विसरता येणारे आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेची किंमत जवान आपल्या जीवाची बाजी लावून करत आहे. नागरिकांनी देखील देशाप्रती असलेले आपले कर्तव्य बजावून देशसेवा करण्याचे त्यांनी आवाहन केले.


अरविंद पारगावकर यांनी मातृभूमीसाठी दिलेले बलिदान हे सर्वश्रेष्ठ असून, प्रत्येक जवानांचे बलिदानाप्रती प्रत्येक भारतीय नतमस्तक असल्याचे सांगितले. प्राचार्य एस.एल. ठुबे यांनी सुखी संसार सोडून देश रक्षणासाठी खडतर जीवन जगणार्‍या जवानांचे योगदान स्पष्ट करुन कारगील युध्दाची माहिती दिली.


उपस्थितांसह विद्यार्थ्यांनी मेणबत्त्या प्रज्वलीत करुन वीर जवानांना नमन केले. तर पाहुण्यांच्या हस्ते पुष्पचक्र हुतात्मा स्मारकावर अर्पण करुन कारगील मधील शूरवीरांना अभिवादन करुन शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी प्रकल्प प्रमुख जस्मितसिंह वधवा, धनंजय भंडारे, दिलीप कुलकर्णी, सहेजकौर वधवा, विजय कुलकर्णी, प्रशांत मुनोत, किरण भंडारी, डॉ. संजय असणानी, डॉ. मानसी असणानी, हरजितसिंह वधवा, जालिंदर सिनारे, अनिल धामणे, महादेव भद्रे, नीलिमा कातोरे, वस्तीगृहाच्या प्रमुख ज्योती मोकळ, युक्ती देसर्डा, गुरुनूरसिंग वधवा, अमिरा वधवा, सानिया सबलोक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. आभार जस्मितसिंह वधवा यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *