स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नगर तालुक्यातील राळेगण ग्रामपंचायत व श्रीराम विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय सैन्यातील आजी-माजी सैनिक व वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वीर पुरुषांची, सैनिकांची वेशभूषा करून वाजत गाजत प्रभात फेरी काढून हर घर तिरंगा उपक्रमाची जागृती केली.
आजी-माजी सैनिक व वीर पत्नी यांना फेटे बांधून औक्षण करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यालयात पारंपारिक वाद्यांसह गावातून मिरवणूकीने आणण्यात आले. सिद्धांत भापकर व सिद्धांत लष्कर यांनी संचलन केले. विद्यालयात झालेल्या समारंभात तिन्ही दलातील विविध पदे भूषविलेल्या माजी सैनिकांनी 1972 च्या युद्धाचा अनुभवापासून ते सुवर्ण मंदिर, कारगील सारख्या विविध मोहिमांची आखणी, नियोजन, प्रत्यक्ष कृती व या मोहिमेत बजावलेल्या कामगिरीची माहिती विद्यार्थी व ग्रामस्थांपुढे मांडली. युद्धातील थरारक प्रसंग ऐकताना अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तसेच विद्यार्थी दशेपासून शालेय शिक्षणा बरोबर व्यायाम, फिटनेस, खेळ याचे महत्व माजी सैनिकांनी सांगून विद्यार्थ्यांना प्रेरीत केले. माजी सैनिक घनःशाम खराडे यांनी विद्यालयास राष्ट्रध्वज भेट दिला.
माजी सैनिकांचा सत्कार समारंभ यशस्वीतेसाठी गावचे उपसरपंच सुधीर पाटील भापकर, पै. शरद कोतकर, भरत हराळ, बबनराव भापकर, सुभाष डावखरे, संतोष हराळ, आदिनाथ खराडे, गोरख हराळ, मुख्याध्यापिका तारका भापकर, बाळासाहेब पिंपळे, विजय जाधव, राजेंद्र कोतकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी रविंद्र पिंपळे, राहुल साळवे, सुनिल पिंपळे, सोपान कुलांगे, माऊली पिंपळे, महादेव पिंपळे, सुनिल कुलांगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.