• Wed. Dec 11th, 2024

राज्यपालांच्या निरोपासाठी शहरातून पाठविण्यात आला दख्खनचा काटेरी गुच्छ

ByMirror

Mar 14, 2022

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचे अनोखे आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेजबाबदार आणि चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपालांचा निषेध नोंदवत, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने राज्यपालांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत पदाच्या निरोपसाठी दख्खनचा काटेरी गुच्छ (बुके) पाठविण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पदापासून कायमचा निरोप देण्याची मागणी करण्यात आली.
संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर सोमवारी (दि.14 मार्च) संबळाच्या निनादात हातात तिरंगा ध्वज घेऊन हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जय शिवाजी… जय डिच्चू कावा… च्या जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, अर्शद शेख, बबलू खोसला, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, आनंद आढाव, कारभारी वाजे, भिमराज वाजे, नंदा साबळे, विजय अवचिते, भाऊसाहेब वाबळे आदी सहभागी झाले होते.


देशाचे राष्ट्रपती आणि देशातील सर्व महामहीम राज्यपालांकडे उन्नत शिवचेतनेचे शिरोमणी या नजरेतून भारतातील जनता पाहता आहे. नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेजबाबदार वक्तव्य केले. त्यानंतर पुन्हा क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल देखील चुकीचे उद्गार काढले. तर झालेल्या चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचे औचित्यही दाखविले नाही. यातून भारतीय संविधानानुसार आपण केलेल्या शपथचा विसर पडल्याचे स्पष्ट होत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
राजसत्ता टिकवून ठेवण्यासाठी राज्यपाल शेंडी आणि शेंदूर या दोन बाबींचा सतत वापर करीत आहेत. जात, धर्म, पंथ, प्रादेशिक वाद यांच्या पलीकडे विचार करण्याची बुद्धी क्षमता देखील त्यांच्यात राहिली नसल्याचे सिध्द झाले असून, त्याची प्रचिती तमाम जनतेस आलेली आहे. तमाम जनतेसमोर त्यांना आदर्श निर्माण करता आलेला नाही. राज्यपाल म्हणून तटस्थ पद्धतीने सतत वर्तन करणे अपेक्षित असताना, त्याऐवजी विशिष्ट विचारसरणीचे, समाजविघातक तत्त्वज्ञान समोर ठेवून चुकीचे वागल्याचा आरोप संघटनेने केला आहे.


राज्यपाल यांना पदावरून पायउतार होण्यासाठी जनतेच्या वतीने कायमचा निरोप देण्याकरिता राज्यपालांसाठी आणलेला काटेरी गुच्छ व त्यांना पदमुक्त करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *