अनाथ विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याची भेट
अहमदनगर (प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालसंगोपन केंद्रातील अनाथ मुलाचा वाढदिवस साजरा करुन, त्याला शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली. समाजात लहान मुलांचे वाढदिवस पालक मोठ्या उत्साहात साजरा करतात, मात्र अनाथ मुले या पासून दुरावली जातात. त्यांचा देखील वाढदिवस साजरा व्हावा या उद्देशाने आरूष मोहिते या बालकाचा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ब्राम्हणी (ता. राहुरी) येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालसंगोपन केंद्रात झालेल्या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन शिंदे, खजिनदार अनिल सावंत, अजय शिंदे, अण्णा शेळके, शालन शिंदे, अनिता सावंत, रोहिणी सावंत, रमेश शिंदे, उत्तम शिंदे, सर्जेराव शेगर, भगवान शेगर, सिताराम सावंत आदी उपस्थित होते.
मोहन शिंदे म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालसंगोपन केंद्र वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी योगदान देत आहे. गरजू विद्यार्थ्यांना सहानुभूतीपेक्षा आधार देऊन त्यांचा सर्वांगीन विकास या ध्येयाने कार्य सुरु आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे उज्वल भवितव्य असून, त्यांना घडविण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आरूष मोहिते या बालकाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालसंगोपन केंद्राचा मोठा आधार व प्रेम मिळत असून, आपल्या कुटुंबीयांप्रमाणे देखभाल केली जात असल्याचे सांगितले.