कोरोनाच्या दोन वर्षानंतर शिक्षणाची वाटचाल व पालकांची जबाबदारी विषयावर रंगला परिसंवाद
विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षक व शाळांशी पालक जोडला जावा -दादाभाऊ कळमकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षक व शाळांशी पालक जोडला जावा. धावपळीच्या जीवनात मुलांसाठी वेळ काढून पालक शाळांशी जोडला गेल्यास मुलांचा गुणवत्तापूर्ण विकास साधला जातो. कोरोना काळात शिक्षकांनी मुलांना दिलेले ऑनलाईन शिक्षण व पालकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या वतीने टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात कोरोनाच्या दोन वर्षानंतर शिक्षणाची वाटचाल व पालकांची जबाबदारी विषयावर परिसंवाद व पालक-शिक्षक मेळाव्याप्रसंगी कळमकर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक (पुणे) रमाकांत काटमोरे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, उत्तर विभागाचे निरीक्षक टि.पी. कन्हेरकर, विस्तार अधिकारी कापरे, अशोक बाबर, कैलास मोहिते, विश्वासराव काळे, श्यामराव व्यवहारे, शिक्षण तज्ञ इम्रान तांबोळी, शेखर उंडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, माध्यमिकचे मुख्याध्यापक एस.एल. ठुबे, कडूस आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे कळमकर म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात 126 शाखा असून, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेने आपली गुणवत्ता सिध्द करुन, सर्वात मोठा पालक मेळावा घेतला. रयत मध्ये सर्वसामान्यांच्या मुलांना घडविण्याचे कार्य सुरु असून, पालकांनी आयटी, तंत्रज्ञान व विविध नवनवीन शाखेत आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ध्येय ठेऊन त्यांचे भवितव्य घडविण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राज्याच्या व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत सर्वात जास्त विद्यार्थी येण्याचा बहुमान शाळेने पटकाविला आहे. कोरोनानंतर शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल झाला असून, विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता, आवड, निवड या गोष्टी विचारात घेऊन त्यांना शिक्षण दिले जात असल्याचे स्पष्ट करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी पार पाडण्याचा जबाबदारीवर मार्गदर्शन केले.
रमाकांत काटमोरे यांनी मुलांना घडविण्यासाठी प्राथमिक शैक्षणिक पाया असतो. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक व पालक यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, पालक वर्ग जागरूक झाल्याने मुलांची गुणवत्ता वाढून स्पर्धा देखील वाढली आहे. गुणवत्तेच्या युगात दर्जेदार व अद्यावत शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले असून, पालकांना शाळेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र पालकांनी देखील त्यांची जबाबदारी पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. टी.पी. कन्हेरकर यांनी शिक्षण प्रक्रिया पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. पालकांनी आपली योग्य भूमिका निभवल्यास विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडणार आहे. नकार व अपयश पचविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. संस्कारासाठी घरातील वातावरण जबाबदार असून, मुले पालकांचे अनुकरण करत असतात. पालकांनी देखील तेवढ्या जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात पालक-शिक्षक संघाची नुतन कार्यकारणी निवडण्यात आली. पालकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला साळुंखे यांनी केले. आभार सुजाता दोमल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल शिंदे, मिनाक्षी खोडदे, इंदूमती दरेकर, शीतल रोहोकले, जयश्री खांदोडे, सोनाली वेताळ, अर्चना जाधव, सचिन निमसे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.