• Wed. Dec 11th, 2024

मिलिटरी हॉस्पिटलला आजी-माजी सैनिकांचे वृक्षरोपण

ByMirror

Aug 18, 2022

माजी सैनिकांच्या कार्याला सैनिकांचा सलाम -कर्नल डॉ. निता गोडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण चळवळ राबविणार्‍या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने मिलिटरी हॉस्पिटल येथे वृक्षारोपण करण्यात आले. मिलिटरी हॉस्पिटलचे अधिकारी कर्नल डॉ. नीता गोडे, मेजर आकाश कवडे, कॅप्टन सत्यम पुरी, सुभेदार सतीश कुमार, हवालदार सुभेदार दानसिंग, नायक करण बोरूडे, कर्नल डॉक्टर सर्जेराव नागरे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली.


कर्नल डॉ. नीता गोडे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पर्यावरण संवर्धनासाठी माजी सैनिक जय हिंदच्या माध्यमातून देत असलेले योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कार्याला सर्व जवानांचा सलाम आहे. मेजर शिवाजी पालवे यांनी सैन्यात उत्कृष्ट काम करून माजी सैनिकांचे संघटन करुन चालवलेले कार्य अभिमानास्पद आहे. येणार्‍या काळात वृक्ष संवर्धनासाठी देखील जय हिंद फाउंडेशन चांगले काम करणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. कर्नल सर्जेराव नागरे यांनी जय हिंद फाऊंडेशन जिल्ह्यात वृक्ष क्रांती घडवून सर्व परीसर हरित व निसर्गरम्य करणार आहे. जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पर्यावरणासाठी उभे केलेले कार्य राज्यासाठी आदर्श ठरणार आहे. सैनिकांनी घेतलेला ध्यास सिध्दीस जात असतो. त्यामुळे जय हिंदचा संकल्प देखील पुर्णत्वास जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


शिवाजी पालवे यांनी जय हिंद फाउंडेशनच्या कार्याची माहिती देऊन मिलिटरी हॉस्पिटलमध्ये लावलेली फळझाडे येणार्‍या काळात रुग्णांसाठी वातावरण व फळांच्या रुपाने लाभदायी ठरणार आहे. परिसरात ऑक्सिजनचे देखील प्रमाण वाढून रुग्णांना निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेजर आकाश कवडे यांनी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये लावलेली 55 आंबा, चिंच, जांभूळ, करंजी, वड ही झाडे आम्ही सर्व सैनिकांना दत्तक देऊन संवर्धन करणार असल्याचे सांगितले. यावेळी फाऊंडेशनचे शिवाजी गर्जे, सुशांत घुले, रामेश्‍वर आव्हाड, संदीप घुले, अशोक मुठे, भाऊसाहेब देशमाने, दादाभाऊ बोरकर आदी उपस्थित होते. मेजर रामेश्‍वर आव्हाड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *