मानवसेवा मनोरुग्णांसाठी तळमळीने करीत असलेले कार्य कौतुकास्पद -डॉ. तेजस्वीनी मिस्कीन
अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांना आधार देऊन पुनर्वसनासाठी कार्य करणार्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पातील मनोरुग्णांची अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आरोग्य तपासणी करुन त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटन जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी तथा मानसोपचार तज्ञ डॉ. तेजस्वीनी मिस्कीन यांच्या हस्ते झाले. यावेळी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळांचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख, जनसंपर्क अधिकारी अंबादास गुंजाळ, सोमनाथ बर्डे, नर्स सुरेखा केदार, प्रियंका गायकवाड, राहुल साबळे, कुणाल बर्डे उपस्थित होते.
मिस्कीन म्हणाल्या की, शहाणी म्हणवणारी व्यवस्था ठिकठिकाणी शहरात, गावखेड्यात, रस्त्यावर बेवारस मनोरुग्ण, गंभीर आजारांनी त्रस्त मानसांना मरण्यासाठी सोडून देते. काही महिलांवर तर लैंगिक अत्याचारही होतात. त्यामधून काही गर्भवती होतात आणि रस्त्यावरच फिरत राहतात. अशांसाठी मानवसेवा प्रकल्प अतिशय तळमळीने करीत असलेल्या कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
मानसोपचार तज्ञ डॉ. मिस्कीन यांनी 54 लाभार्थ्यांची मानसिक आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधोपचार दिले. या शिबीरात जिल्हा रुग्णालयाचे मानसिक आरोग्य विभाग समाजसेवक गोरक्ष इंगोले, कम्युनिटी नर्स विवेक मगर यांनी उपस्थित राहून समुपदेशनास सहाय्य केले.