सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर सभा घेऊन त्याचा सर्व खर्च सभासदांच्या माथी मारल्याचा आरोप
सेवानिवृत्त होत असलेल्या गुरुजींचा प्रतिकात्मक पुतळा प्रवेशद्वारावर उभा करुन निदर्शने
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात अनाधिकृतपणे घेण्यात आली असून, याचा सर्व खर्च सभासदांच्या माथी मारण्यात आल्याचा अरोप करत परिवर्तन मंडळाचे विरोधी संचालक व सभासदांनी सभेच्या ठिकाणी आंदोलन केले. टिळक रोड येथील नंदनवन लॉन येथे झालेल्या सभेच्या प्रवेशद्वारावर मी निवृत्त होतोय खर्च मात्र सभासदांचाच…. हे मजुकर लिहिलेले गुरुजींचा प्रतिकात्मक पुतळ्यास हार घालून निषेध नोंदवून सभासदांना 15 टक्के लाभांश मिळावा व इतर मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात सोसायटीचे संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे यांच्यासह राजेंद्र कोतकर, बाळासाहेब राजळे, सुनिल दानवे, नंदू शितोळे, भाऊसाहेब जिवडे, अर्जुन भुजबळ, मंगेश काळे, प्रसाद साठे, बाळासाहेब जाधव, जर्नाधर सुपेकर, राहुल आवारे, दिलीप बोठे आदींसह सभासद सहभागी झाले होते.
सभासदांना पंधरा टक्के लाभांश मिळावा, जामीन कर्ज मर्यादा 25 लाख करावी, सभासदांचे कायम ठेवीवरील व्याजदर वाढवण्याची मागणी विरोधी संचालक व सभासदांनी लाऊन धरली होती. दरवर्षी मे महिन्यात सभा होईल काय?, कायम ठेवीवरील व्याज मागील वर्षाप्रमाणे एप्रिल महिन्यात का दिले नाही?, सुट्टी असल्यामुळे वार्षिक अहवाल अद्यापि सभासदांना पोहोचला नाही याला जबाबदार कोण?, नोकर भरती करताना मयत झालेल्या सभासदांच्या पाल्यांना प्राधान्य का दिले नाही?, डाटा सेंटर सोसायटीच्या बाहेर त्रयस्थ यंत्रणेला देण्याचे गोड बंगाल काय? आदी प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले. तर संस्थेच्या शाखांची जागा खरेदी, डाटा सेंटर भाडे तत्वावर देणे, नवीन लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे अशा आर्थिक लाभांसाठी भर उन्हाळ्यात यावर्षी संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच वार्षिक सभा ठेवण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मयत सभासदांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद सत्ताधारी संचालक मंडळाने केली नसल्याचा व मयत सभासदांच्या पाल्यांना नोकर भरतीत डावलल्याचा निषेधही यावेळी नोंदविण्यात आला.