अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जन शिक्षण संस्थेत महिला व युवतींनी एकत्र येत स्वकर्तृत्व व आत्मनिर्भरतेची गुढी उभारली. कौशल्य विकास मंत्रालय अंतर्गत जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षणातून स्वत:च्या पायावर उभे करण्याचे कार्य मागील पंधरा वर्षापासून सातत्याने सुरु आहे. संस्थेच्या नालेगाव येथील मुख्य कार्यालयात प्रशिक्षणार्थी महिला व युवतींना गुढी उभारुन सक्षमीकरणाचा नारा दिला.
घर आणि शाळा, घर आणि गृहिणी, चूल आणि मूल, अशी महिला वर्गाविषयी परंपरागत असलेली विशेषणे बाजूला सारुन स्वकर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर होऊन बदल घडविण्याच्या संकल्पाचा सूर महिलांमधून उमटला. गुढीपाडवा व मराठी नव वर्ष आरंभनिमित्त महिला व युवती पारंपारिक वेशभुषेत नटून आल्या होत्या. महिलांनी गुढीचे पूजन करुन उपस्थितांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जन शिक्षण संस्थेच्या कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार यांच्या संकल्पनेतून झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, महिला प्रशिक्षका कविता वाघेला, माधुरी घाटविसावे आदींसह महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.