महात्मा फुले यांनी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून विकासाचा प्रकाशमार्ग दाखविला -सचिन जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. संपत शिंदे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, अशोक बाबर, उपाध्यक्ष अमोल कांडेकर, गणेश बोरुडे, संतोष ढाकणे, तुषार टाक, मनोज आंबेकर, बजरंग भुतारे, अशोक आगरकर, लहू कराळे, यशवंत गारडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सचिन जगताप म्हणाले की, महात्मा फुले यांनी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून विकासाचा प्रकाशमार्ग दाखविला. सावित्रीबाईंच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. फुले दांम्पत्यांनी शिक्षणाची दारे उघडी करुन समाजात क्रांती घडवल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी रुढी, पंरपरेने बरबटलेल्या संस्कृतीत महिलांना मानाचे स्थान नव्हते. महात्मा फुलेंनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे करुन त्यांना समाजात सन्मान मिळवून दिला. आज विविध क्षेत्रात स्त्रीया आपले कर्तृत्व गाजवित असताना याचे श्रेय महात्मा फुलेंना जात असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत पथनाट्य सादर करुन शिक्षणाचा संदेश देणारे आदित्य धनंजय जाधव व सर्वज्ञा अविनाश कराळे या विद्यार्थ्यांचा यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.