• Wed. Dec 11th, 2024

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

ByMirror

Feb 20, 2022

शासनानेही शिक्कामोर्तब करुन तारखेचा संभ्रम केला दूर

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकारितेचे जनक तथा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती रविवारी (दि.20 फेब्रुवारी) मराठी पत्रकार परिषद व शहरातील पत्रकारांच्यावतीने साजरी करण्यात आली. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या तारखेचा संभ्रम आता दूर झाला आहे. राज्य शासनाने परिपत्रक काढून 20 फेब्रुवारी रोजी जयंती साजरी करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांसोबतच आता सर्व सरकारी कार्यालयांतही जयंती कार्यक्रम पार पडला.
पत्रकारांतर्फे आयोजित कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, विजयसिंह होलम, शिरीष कुलकर्णी, राजेंद्र येंडे, संजय सावंत, अनिल हिवाळे, दौलत झावरे, संजय पाठक, सुधीर पवार, अन्सार सय्यद, वाजिद शेख, महेश भोसले, आफताब शेख, अमीर सय्यद, गझनफर सय्यद आदींसह पत्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विजयसिंह होलम म्हणाले की, आतापर्यंत बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या तारखेसंबंधी संभ्रम होता. अनेक जण 6 जानेवारी पत्रकार दिनी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असल्याचे मानत होते. राज्य सरकार व पत्रकारांनी मिळून 20 फेब्रुवारी रोजी जयंती असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. जांभेकर यांची नेमकी जयंती शोधून काढण्यात मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्याचे मोठे यश आहे. ही जयंती साजरी करण्याची प्रथा पत्रकार परिषदेच्या वतीने सुरू असून, कोरोनामुळे छोट्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आला आहे. ज्यांच्यामुळे मराठी पत्रकारिता अस्तित्वात आली, ज्यामुळे पत्रकारांना ओळख मिळाली, अशा बाळशास्त्री जांभेकरांना विसरून चालणार नाही. या भावनेने हा जयंती कार्यक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिलीप वाघमारे म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा संभ्रम दूर झाला आहे. 20 फेब्रुवारी रोजी जयंती व 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा होणार आहे. बाळशास्त्रींचा आदर्श समोर ठेऊन पत्रकारांनी संकल्प घेऊन पत्रकारितेची दिशा ठरवावी. पत्रकारितेच्या माध्यमाने समाजाला दिशा देऊन, अन्याय विरोधात वाचा फोडण्याचे कार्य पत्रकारांनी करण्याचे त्यांनी आवाहन केले. आभार आफताब शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवेद शेख, प्रियंका धारवाले-शेळके, रमीज शेख, अनिकेत गवळी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *