कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी प्रक्रियेबाबत जागरुकता
अहमदनगर(प्रतिनिधी)- मध्यस्थी केंद्र कौटुंबिक न्यायालयाचा पाया आहे. कौटुंबिक न्यायालयात येणार्याकडे आरोपी म्हणून नव्हे, तर व्यक्ती म्हणून पाहिले जाते. कौटुंबिक वातावरणात दोन कुटुंबातील वाद न्याय प्रक्रियेने सोडविण्यात येते. कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. कौटुंबिक न्यायालयात मध्यस्तीने मोठा फायदा होतो. पती-पत्नीच्या वादात मुलांचे भवितव्याचा विचार प्रामुख्याने केला जातो. मागील वर्षी मध्यस्थीने 755 दावे मिटवण्यात आले असून, त्यांचे सुखी संसार सुरू असल्याचे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांनी केले.
अहमदनगर कौटुंबिक न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, फॅमिली कोर्ट अॅडव्होकेट बार असोसिएशन, अहमदनगर बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी प्रक्रियेबाबत जागरुकता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश कंक बोलत होत्या. यावेळी अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. के.एम. देशपांडे, न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा अॅड. निर्मला चौधरी, कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक सुषमा बिडवे, फॅमिली कोर्ट अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिवाजी कराळे, उपाध्यक्ष अॅड. एल.बी. कचरे, खजिनदार अॅड. राजेश कावरे, अॅड. स्वाती नगरकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविकात अॅड. शिवाजी अण्णा कराळे यांनी पती-पत्नीतील कौटुंबिक वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केंद्र प्रभावी ठरत आहे. न्यायालयात सर्व वकील संघ एकत्र येऊन पक्षकारांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. वेगवेगळे बार असले वकील म्हणून सर्व एकच घटक असल्याचे त्यांनी सांगितले. अॅड. स्वाती नगरकर म्हणाल्या की, धावत्या युगात मध्यस्थी केंद्र काळाची गरज बनली आहे. कमी वेळेत योग्य न्याय कसा मिळेल? हे मध्यस्थी केंद्राचे प्रमुख उद्दीष्ट आहे. पुढील भविष्याची वाटचाल सुकर होण्यासाठी कौटुंबिक वादात पती-पत्नीने मुलांच्या भवितव्यासाठी परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. आयुष्य एकदाच असते, टोकाची भूमिका न घेता मध्यस्थी मार्फत वाद मिटवण्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. निर्मला चौधरी म्हणाल्या की, कौटुंबिक न्यायालयातील मध्यस्थी केंद्र हे न्याय प्रक्रियेचा एक घटक आहे. दोघं पती-पत्नीतील राग दूर करून आयुष्याचे पुढील भवितव्याची वाट मध्यस्ती केंद्र दाखवत असते. समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जात असताना पती-पत्नीचा संसार पुन्हा बहरावा ही वकिलांचीही भूमिका असते. मध्यस्थी केंद्राची समाजाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अॅड. के.एम. देशपांडे यांनी वाद कितपत वाढवायचा, कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचे? ते पती-पत्नीने ठरवावे. मनातील समज गैरसमज दूर करून सुखी संसार केला पाहिजे. वकील, पक्षकारांनी तोडण्यापेक्षा जोडण्याला प्राधान्य द्यावे. दोन्ही कुटुंबीयांनी इगो बाजूला ठेवून मध्यस्थीची भूमिका पार पाडावी. कौटुंबिक न्यायालयात काम करताना वकील पैशापेक्षा आशीर्वाद घेण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
समुपदेशक सुषमा बिडवे म्हणाल्या की, कौटुंबिक दाव्यात तडजोड होण्यासाठी प्रयत्न केले जातात. पती-पत्नीने एकत्र संसार करावा यासाठी प्रयत्न केले जाते. मध्यस्थी केंद्रा मार्फत त्यांच्यात संवाद घडवून, निष्कर्ष काढून निर्णय प्रक्रियेतून समुपदेशन केले जाते. पती-पत्नी एकत्र नांदण्यास तयार आहेत का? हे महत्त्वाचे पाहिले जाते. कौटुंबिक न्यायालयाची भूमिका मध्यस्थी केंद्रा मार्फत जोडायची व परिस्थिती नूसार न्याय करण्याची असते. या प्रक्रियेत महिलांनाही आत्मविश्वास देण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. राजेश कावरे यांनी केले. आभार ड एल.बी. कचरे यांनी मानले. यावेळी फॅमिली कोर्ट अॅडव्होकेट बार असोसिएशनचे कार्याध्यक्ष अॅड. सुरेश लगड, सचिव अॅड. अनिता दिघे, अॅड. अर्चना शेलोत, अॅड. अनुराधा येवले, अॅड. मच्छिंद्र आंबेकर, अॅड. राजाभाऊ शिर्के, अॅड. शिवाजी सांगळे, अॅड. सुचिता बाबर, अॅड. सत्यजीत कराळे, अॅड. करुणा शिंदे, अॅड. प्रकाश गायकवाड आदिसह पक्षकार उपस्थित होते.