महिलांचे आरोग्य निरोगी असले, तरच कुटुंबाचे आरोग्य सुदृढ राहणार -डॉ. कुदरत शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांचे भविष्य घडविण्यासाठी घरातील महिलेला कौटुंबीक जबाबदारी सांभाळून खूप परिश्रम घ्यावे लागतात. अनेक जबाबदार्या पार पाडताना महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. याचे दुष्परिणाम उतार वयात दिसून येतात. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागृक राहण्याची गरज आहे. महिलांचे आरोग्य निरोगी असले तरच कुटुंबाचे आरोग्य देखील सुदृढ राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन स्त्री रोग तज्ञ डॉ. कुदरत शेख यांनी केले.
भिंगार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये महिलांच्या आरोग्य विषयावर झालेल्या व्याख्यानात ज्येष्ठ महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. माजी नगरसेविका शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी स्त्री रोग तज्ञ डॉ. मारिया शेख, दंतरोग तज्ञ डॉ. आयशा शेख-राजे, डॉ. सईद शेख, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपट नगरे, सचिव विवेक प्रभुणे, खजिनदार सुभाष होडगे, उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडे, आसाराम सोनसळे, मिरा आल्हाट, अशोक पवार, मधुकर शेरकर, सुरेश कानडे, अशोक गलांडे, गोकुळ हळगावकर, सुधाकर कटोरे, गोरख वाघुंबरे, विश्वंभर कंगे, प्रकाश तरवडे, दिलीप माळगे, कैलास बिडवे, अनंद सदनापुर, हरी लोखंडे आदींसह ज्येष्ठ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात पोपट नगरे यांनी भिंगार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने वर्षभर घेण्यात येणार्या उपक्रमाची माहिती दिली. डॉ. मारिया शेख यांनी ज्येष्ठ महिलांनी उतार वयात आरोग्याबाबत कशा पध्दतीने काळजी घ्यावी? याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. दंतरोग तज्ञ डॉ. आयशा शेख-राजे यांनी दात हा शरीराचा महत्त्वा घटक असून, त्याचे विकार सुरु झाल्यावर त्याचा त्रास व महत्त्व समजते. अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये दातांचे विकार उद्भवतात. दात चांगले राहण्यासाठी त्याची योग्य वेळी निगा राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महिला वर्ग देखील तंबाखू, मिसरी या गोष्टींचा सर्रास वापर करत असल्याने त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होतात. तर परिणामी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सईद शेख यांनी भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सुरु असलेले उपक्रम प्रेरणादायी असून, अनेक ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. सुभाष होडगे म्हणाले की, वर्षभर ज्येष्ठ नागरिक संघ स्त्री जन्माचे स्वागत करत असतो. सदस्यांच्या कुटुंबात मुली जन्माला आल्यास पेढे वाटून स्त्री जन्माचे स्वागत केले जात असल्याची माहिती दिली. माजी नगरसेविका शुभांगी साठे यांनी ज्येष्ठ नागरिक संघासाठी प्रशस्त भवन बांधण्याकरिता छावणी परिषदेच्या माध्यमातून जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्व ज्येष्ठ महिलांना उन्हाळ्यानिमित्त पाण्याची बॉटल भेटवस्तू म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष होडगे यांनी केले. आभार कैलास मोहिते यांनी मानले.