बाबासाहेबांतत्त्व व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यास समाजाचा खरा विकास साधला जाणार -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, वकिल सेलचे अॅड. योगेश नेमाणे, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, संजय खामकर, शिवाजी साळवे, गणेश बोरुडे, निलेश इंगळे, गौतम भांबळ, महादेव कराळे, लहू कराळे, मनिष साठे, सुजाता दिवटे योगिता कुडिया, सुप्रिया काळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, जिल्ह्यात, राज्यात, देशात नव्हे, तर संपूर्ण जगात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. भारतासह परदेशात. त्यांचे जीवन चरित्र अभ्यासले जात असून, परदेशातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांचे धडे शिकवले जातात. त्यांनी समाजाला समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाची दिलेली शिकवण प्रेरणादायी आहे. त्यांचे तत्त्व व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यास समाजाचा खरा विकास साधला जाणार आहे. त्यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत घेऊन गेल्यास समाजाला एक दिशा मिळणार असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविल्यास बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणारे डॉ. बाबासाहेबांचे विचार आजही सर्व समाजाला दिशादर्शक आहे. महापुरुषांच्या विचारांनी व प्रेरणेने बदल घडणार असून, त्यांची मार्गदर्शक तत्त्वे मानवतेच्या उध्दारासाठीच असल्याचे त्यांनी सांगितले.