• Wed. Dec 11th, 2024

भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण

ByMirror

Aug 25, 2022

दडपशाही व दादागिरी करणार्‍या त्या सरपंच व सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अतिक्रमणाची तक्रार केल्याचा राग धरुन हॉटेलची तोडफोड व गल्ल्यातील पैसे काढून, जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिक्रमणाची तक्रार केल्याचा राग धरुन मौजे खानापूर (ता. शेवगाव) येथील सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या साथीदाराने हॉटेलची तोडफोड व गल्ल्यातील पैसे काढून, जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केल्याची तक्रार करुन देखील संबंधितांवर गुन्हे दाखल होत नसल्याने भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर गुरुवारी (दि.25 ऑगस्ट) उपोषण करण्यात आले. शहर जिल्हाउपाध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपोषणात कुसुम शेलार, लिला शिंदे, लक्ष्मी शिंदे, आशा सोनवणे, लता शिंदे, पूजा शिंदे, निकिता शिंदे, सुनिता चकोर, आकांक्षा राजपूत, शालनी साबळे, संगिता वाघमारे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.


गायकवाड यांचे पैठण-शेवगाव रोडवर स्वत:च्या मालकीच्या जागेत हॉटेल आहे. त्या हॉटेल समोर गावातील सरपंचाने अनाधिकृतपणे अतिक्रमण करुन हॉटेल उभे केले आहे. याप्रकरणी सदरचे अतिक्रमण हटविण्यासाठी काही दिवसांपुर्वी शारदा गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अतिक्रमण हटविण्यासाठी तक्रार करुन उपोषणाचा इशारा दिला होता. याचा राग मनात धरुन सदर सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या साथीदाराने गायकवाड यांच्या मालकीच्या हॉटेलची 16 ऑगस्ट रोजी रात्री तोडफोड करुन कामगाराला मारहाण केली. तर गल्ल्यातील पैसे काढून, जेसीबीच्या सहय्याने चर खोदून रस्ता बंद केला आहे. मात्र पोलीसांनी या प्रकरणाची दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.


अतिक्रमणाची तक्रार केल्याचा राग धरुन दडपशाही, दादागिरी करणार्‍या सदर आरोपींविरोधात शेवगाव पोलीस स्टेशनला तक्रार करुन देखील संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून, आरोपींवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *