अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया समोर उपोषणाचा इशारा
पैठण-शेवगाव रोडवर सरपंच व त्यांच्या परिवाराने अतिक्रमण केले असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती महिला मोर्च्याच्या वतीने मौजे खानापूर (ता. शेवगाव) येथील पैठण-शेवगाव रोडवरील हॉटेलचे अनाधिकृत अतिक्रमण हटविण्याची मागणी अनुसूचित जाती महिला मोर्च्याच्या शहर जिल्हाउपाध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरचे अतिक्रमण न हटविल्यास भाजप अनुसूचित जाती महिला मोर्च्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मौजे खानापूर (ता. शेवगाव) पैठण रोडच्या हद्दीत सरपंच व त्यांच्या परिवाराने अतिक्रमण करून हॉटेल टाकले आहे. याचा त्रास सर्वसामान्य परिसरातील नागरिकांना होत आहे. अतिक्रमणधारकांना राजकीय पक्षाचे पदाधिकारी पाठबळ देत असल्याने सदरचे अतिक्रमण काढले जात नसून, या रस्त्यावर इतर अतिक्रमणधारकांचा प्रकार दिवसंदिवस वाढत आहे. रस्त्यावरील अनाधिकृत अतिक्रमणे हटविल्यास अशा कृत्यांना आळा बसणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर प्रकरणी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग शेवगाव यांना अतिक्रमण हटविण्याबाबत अर्ज देण्यात आला होता. मात्र अद्यापि कारवाई झाली नसून, पैठण-शेवगाव रोडवरील हॉटेलचे अनाधिकृत अतिक्रमण हटवून अतिक्रमण धारकांवर योग्य कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हाउपाध्यक्षा गायकवाड यांनी केला आहे.