फ्रेंडस क्लबचा सिटी क्लबवर 1 गोलने विजय
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेत मंगळवारी (दि.24 मे) झालेल्या रंगतदार सामन्यात बाटा एफसीने गुलमोहर एफसीला बरोबरीत रोखले. तर फ्रेंडस क्लबने 1-0 गोलने सिटी क्लबवर विजय मिळवला.
भुईकोट किल्ला मैदान येथे सुरु असलेल्या स्पर्धेत बाटा एफसी विरुध्द गुलमोहर एफसी मधील सामना शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा राहिला. बाटा एफसीने कडून दाऊद शेखने 1 तर गुलमोहर कडून रोहन याने एक गोल केला होता.
विजय मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत खेळाडू एकमेकांशी झुंजत होते. मात्र सामन्याची वेळ संपल्याने हा सामना बरोबरीत सुटला.
दुसर्या फ्रेंडस विरुध्द सिटी क्लब या सामन्यात फ्रेंड्स संघाकडून अक्षय बोरुडे याने 1 गोल केला. फ्रेंड्सच्या खेळाडूंनी शेवट पर्यंत सिटी क्लबच्या खेळाडूंना खेळवत ठेवले. अंतिम क्षणापर्यंत सिटी क्लबला गोल करता न आल्याने फ्रेंड्स क्लब या सामन्यात विजयी ठरला. स्पर्धेसाठी पंच म्हणून रुशी पाटोळे, सचिन पात्रे, जॉय जोसेफ, अभय साळवे, अन्वर शेख, सुशिल लोट यांनी काम पाहिले.