उपांत्य फेरीत फिरोदीया शिवाजीयन्स विरुध्द बाटा एफसी तर फ्रेंडस विरुध्द आंबेडकर एफसी संघ एकमेकांना भिडणार
अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेत गुरुवारी (दि.26 मे) झालेल्या रंगतदार सामन्यात फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीने गुलमोहर संघावर 1-0 गोलने विजय मिळवला. तर दुसर्या सामन्यात बाटा एफसीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन सिटी क्लबवर सहजासहजी 5-0 गोलने विजय मिळवला.
भुईकोट किल्ला मैदान येथे होत असलेल्या या स्पर्धेत विजयी झालेले फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमी व बाटा एफसीने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत फिरोदीया शिवाजीयन्स विरुध्द बाटा एफसी व फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमी विरुध्द आंबेडकर एफसी संघ एकमेकांना भिडणार आहे. यामधील विजेत्या संघामध्ये अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 साठी अंतिम सामना होणार आहे.
फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीने गुलमोहर संघाला शेवट पर्यंत खेळवत ठेवले. गुलमोहर संघावर खेळाचा दबदबा कायम राखून शून्य गोलवर रोखून धरले. फ्रेंडस स्पोर्टस कडून मयुरने 1 गोल करुन 1-0 ने गुलमोहर संघावर विजय मिळवला.
दुसरा सामना बाटा एफसी विरुध्द सिटी क्लब यांच्यात झाला. बाटा एफसीचा थरारक खेळ प्रेक्षकांना अनुभवयास मिळाला. सुरुवातीपासूनच सिटी क्लबला रोखून त्यांना एकही गोल करु दिला नाही. तर आक्रमक खेळी करुन बाटा संघाकडून आदित्य भिंगारदिवे, प्रकाश कनोजीया, जैनम मुथा यांनी प्रत्येकी 1 तर दाऊद शेख याने 2 गोल करुन तब्बल 5-0 गोलने सिटी क्लबवर दणदणीत विजय मिळवला. स्पर्धेसाठी पंच म्हणून जॉय जोसेफ, अतुल नकवाल, सुशील लोट, सचिन पाथरे यांनी काम पाहिले.