महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव
58 रुग्णांवर केली जाणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्यसाधून गरजूंसाठी नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. तर या शिबीरातील गरजू ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबीराचे उद्घाटन महात्मा फुले व डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिल झोडगे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, भाजपचे माजी शहराध्यक्ष मिलिंद गंधे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ जाधव, अय्युब पठाण, राजेंद्र बोरुडे, दिलीप गायकवाड, वसंत कापरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे म्हणाले की, सामाजिक परिवर्तनाची नांदी क्रांतीसुर्य महात्मा फुले व डॉ.बाबासाहेबांच्या कार्याने घडली. दोन्ही महापुरुषांनी शिक्षणाचा कानमंत्र देऊन समाजाच्या उध्दारासाठी सर्वस्वी पणाला लावले. अशा महापुरुषांचे विचार प्रेरणादायी असून, कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना आधार देण्यासाठी त्यांच्या विचाराने फिनिक्स फाऊंडेशन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश पोटे म्हणाले की, नावासाठी काम न करता, सामाजिक सेवेचा वसा घ्यावा लागतो. दोन, तीन सामाजिक उपक्रम घेवून समाजसेवक होता येत नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारानेच फिनिक्स फाऊंडेशनचे सामाजिक कार्य चालू आहे. जालिंदर बोरुडे यांनी शासकीय नोकरी सांभाळताना समाजसेवेचा घेतलेला वसा निस्वार्थ भावनेने पार पाडत आहे. कोरोनाच्या संकटकाळात फिनिक्स फाऊंडेशन करीत असलेल्या रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल झोडगे म्हणाले की, महापुरुषांनी केलेल्या कार्याची जाणीव ठेऊन प्रत्येकाने समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याची गरज आहे. महापुरुषांचे विचार अंगीकारल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे सांगून, त्यांनी फिनिक्सच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. मिलिंद गंधे यांनी महापुरुषांनी समतेचे विचार दिले. मात्र आज समाजाने महापुरुषांना जाती-धर्मात वाटले असून, त्यांचा समतेचा व सामाजिक सेवेचा विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सावता महाराज मंदिरात झालेल्या शिबीरात 372 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तर 58 रुग्णांवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटल मध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी केले. आभार सौरभ बोरुडे यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी ओम बोरुडे, जय बोरुडे, जगदीश बोरुडे, साई धाडगे आदींसह फिनिक्स फाऊंडेशनचे पदाधिकारी व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.