कृत्रिम दंतरोपण शिबीराला महिलांचा प्रतिसाद
प्रयास, नम्रता दादी-नानी ग्रुप व गोरे डेंटल हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- कमी वयात दात काढल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दात काढल्यास त्यावर कृत्रिम दात बसवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने दात देखील शरीरातील महत्त्वाचा घटक आहे. महिलांनी कुटुंबाची काळजी घेताना स्वत:सह कुटुंबातील सदस्यांची दातांची काळजी घ्यावी. फास्टफुड व चॉकलेटमुळे दातांचे आरोग्य धोक्यात येत आहे. यासाठी दातांची स्वच्छता व निगा राखण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन डॉ. सुदर्शन गोरे यांनी केले.
प्रयास, नम्रता दादी-नानी ग्रुप व गोरे डेंटल हॉस्पिटलच्या वतीने महिलांसाठी कृत्रिम दंतरोपण शिबीर व गर्भसंस्कार आणि स्तनपान विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गोरे बोलत होते. यावेळी जयश्री पुरे, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, डॉ. पांडुरंग सुदामे, राजेंद्र पडोळे, ज्योती कानडे, स्वाती गुंदेचा, प्रयासच्या उपाध्यक्षा सविता गांधी, दादी नानीच्या सचिव शोभा पोखर्णा, अनिता काळे, सुजाता पुजारी, शशिकला झरेकर, जयमाला पवार-केदारी, मीनाक्षी जाधव आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी घरातील लहान मुले व महिलांना दंत विकाराच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. तसेच गर्भसंस्कार व स्तनपानबद्दल योग्य माहिती मिळण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले गेले असल्याची माहिती दिली. राजेंद्र पडोळे यांनी शेती, शिक्षण व महिलांना विविध व्यवसाय करण्यासाठी राजसाईच्या गोल्ड निधीच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज दिले जात असल्याची माहिती दिली.
अनिता काळे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सरकारच्या हर घर तिरंगा अभियानासाठी जिजाऊ महिला ब्रिगेड व विजया लक्ष्मण काळे फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी जनजागृती अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ. पांडुरंग सुदामे यांनी गर्भसंस्कार या विषयावर मार्गदर्शन करुन लहान बाळांची काळजी कशी राखावी याबाबत महिलांना संबोधित केले. जिल्हा रुग्णालयाच्या जयमाला पवार-केदारी यांनी स्तनपानबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ. सुदर्शन गोरे यांनी सर्व महिलांची दंत तपासणी करुन कृत्रिम दंतरोपणाची माहिती दिली. तसेच यावेळी महिलांसाठी मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा घेण्यत आल्या. विजेत्या महिलांना जयश्री पुरे यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली.