मुलांच्या भवितव्याचा पाया प्राथमिक शिक्षक रचतात -डॉ. रत्नाताई बल्लाळ
अहमदनगर(प्रतिनिधी)- मुलांच्या भवितव्याचा पाया प्राथमिक शिक्षक रचतात. प्राथमिक दशेत मुलांची जडण-घडण होत असते. प्राथमिक शिक्षक सुसंस्कार भावी पिढी घडविण्यासाठी योगदान देत असल्याचे प्रतिपादन पद्मशाली विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ यांनी केले.
गांधी मैदान येथील प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका मीना परदेशी यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात डॉ. बल्लाळ बोलत होत्या. यावेळी संस्थेचे विश्वस्त शंकर सामलेटी, राजेंद्र म्याना, माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल, मार्कंडेय विद्यालयाचे उपप्राचार्य पांडुरंग गोणे, लखमीचंद परदेशी, पर्यवेक्षिका सरोजनी रच्चा, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, कल्याणी परदेशी, वैशाली परदेशी, कुंदन परदेशी आदींसह शालेय शिक्षक उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. बल्लाळ म्हणाल्या की, प्राथमिक शिक्षिका मीना परदेशी यांनी अनेक सर्वसामान्य कामगार घटकातील मुलांना दिशा देण्याचे कार्य केले. आज विविध पदावर त्यांचे माजी विद्यार्थी कार्यरत असून, त्यांनी दिलेल्या योगदानाचे हे फळ असल्याचे त्यांनी सांगितले.
सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांनी सेवापूर्ती निमित्त मीना परदेशी व लखमीचंद परदेशी यांचा सत्कार करुन गौरव केला. प्रास्ताविकात श्रीनिवास मुत्याल यांनी प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयात मीना परदेशी यांनी केलेल्या 30 वर्षापेक्षा जास्त काळावधीत केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
बाळकृष्ण गोटीपामुल म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाचे पाईक म्हणून परदेशी यांनी काम केले. सर्वसामान्य कामगार वर्गातील मुलांना शिक्षण देण्याचे काम त्यांनी केले. प्राथमिक विभागातील मुलांचे आवडत्या शिक्षिका म्हणून त्यांची आजही ख्याती कायम आहे. राजेंद्र म्याना यांनी प्रत्येक व्यक्ती त्यांना घडविणार्या प्राथमिक शिक्षकांना कधीही विसरत नाही. परदेशी यांनी शाळेसाठी दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील व त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही शाळेसाठी वेळ देण्याचे सांगितले. लखमीचंद परदेशी यांनी शिक्षक, आई-वडिल व अध्यात्म गुरु हे जीवनात असणारे तीन गुरुंना महत्त्वाचे स्थान आहे. या गुरुंच्या शिदोरीने यशस्वी जीवन प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी परदेशी मॅडमने भावी आयुष्यासाठी चांगल्या गोष्टी शिकविल्या. त्यांच्यामुळे जीवनात यशस्वी झालो, त्या न संपणार्या ज्ञानाचे पुस्तक असून सतत उलगडत राहत असल्याची भावना व्यक्त केली. संस्थेचे माजी अध्यक्ष शरद क्यादर व विद्यमान अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांनी परदेशी यांना पाठवलेले शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
अनुष्का व कृष्णतनु येल्ले या विद्यार्थ्यांनी रामायणातील लव कुश यांनी गायलेले बहारदार गीत सादर केले. सत्काराला उत्तर देताना मीना परदेशी यांनी शाळेत माहेर प्रमाणे प्रेम मिळाले. शाळेत सेवानिवृत्त झाले तरी या शिक्षण क्षेत्राशी निवृत्त होणार नसून, शाळेसाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचेता म्याना यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.