जय श्रीराम व हनुमानजींच्या जय घोषाने भाविकांचा उत्सहात सहभाग
अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील सारसनगर भागातील पावन लिंबाचा मारुती मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार्या हनुमानजींच्या मुर्तीची शनिवारी (दि.23 एप्रिल) भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भाविक भगवे ध्वज तर महिला डोक्यावर तुलस व कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जय श्रीराम व हनुमानजींचा जय घोष करत भाविकांनी धार्मिक गीतांवर ठेका धरला होता. भगवान श्रीराम व हनुमानजींच्या वेशभुषेत सहभागी झालेल्या बालकांनी सर्वांचे लक्ष वेधले.
महात्मा फुले चौक पासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. सारसनगरच्या विविध भागातून या शोभायात्रेचे मार्गक्रमण झाले. नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिराचे संचालक मंडळ रामदास आगरकर, संतोष नवसुपे, रुपचंद खिळे, शिवाजी येवले, सुनिल कचरे, राजेंद्र दळवी, राजू आंबेकर, समीर खडके, शंभू नवसुपे आदी उपस्थित होते.
भजनी मंडळ व धार्मिक गीतांनी परिसर भक्तीमय बनले होते. तर महिलांनी फुगड्यांचा फेर धरला होता. या शोभायात्रेचे ठिकठिकाणी भाविकांनी स्वागत करुन मिरवणुकीतील हनुमानजींच्या मुर्तीचे दर्शन घेतले. शोभायात्रेचा समारोप नामगंगा चौक राजश्री सोसायटी येथील पावन लिंबाचा मारुती मंदिरात झाला. सोमवारी (25 एप्रिल) हनुमानजींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते होणार असून, मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.