जीवघेणा हल्ला करणार्या आरोपींना अटक करा
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेच्या वादातून कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करणार्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथील ढोकचौळे कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सोमवारी (दि.21 मार्च) उपोषण केले. या प्रकरणात आरोपी असलेले संबंधित व्यक्ती पोलीसात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी कुटुंबीयांना वारंवार शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप आदिनाथ भाऊसाहेब ढोकचौळे व त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ढोकचौळे कुटुंबीयांचे त्यांच्या नातेवाईकांसह जागेचा वाद सुरु आहे. आदिनाथ ढोकचौळे यांनी पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी वेळोवेळी निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटही घेतली. संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने नातेवाईक असलेल्या ढोकचौळे कुटुंबातील सदस्यांनी 23 फेब्रुवारी रोजी आईला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा संबंधित आरोपींनी राहत्या घरामध्ये घुसून हल्ला केला. यामध्ये आरोपींनी कुर्हाड, कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण केली. डोक्यावर कुर्हाडीने वार करुन, मोबाईल हिसकावले व पत्नीच्या गळ्यातील दागीना तोडून नेल्याची तक्रार आदिनाथ ढोकचौळे यांनी दिली आहे. तर पोलीसांनी याप्रकरणी पूर्ण जबाब घेतला नसल्याचा आरोप देखील केला आहे.
8 मार्च रोजी पुन्हा यामधील एका आरोपीने घरी येऊन पत्नीला पोलीसात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर आरोपींनी यापुर्वी कुटुंबीयांवर हल्ला केलेला आहे. त्यांच्यापासून कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पिडीत ढोकचौळे कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण सुरु केले आहे.