• Wed. Dec 11th, 2024

पालकांनी मुलांना अध्यात्मिकतेकडे वळविणे काळाची गरज आहे -इंदुरीकर महाराज

ByMirror

Jun 23, 2022

केडगाव येथे इंदुरीकर महाराजांच्या किर्तनास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- वै. लक्ष्मण चुडाजी कोतकर यांच्या यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त केडगाव येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तनास केडगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी निशा उद्योग समूहाचे संचालक जालिंदर कोतकर यांनी उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.


या भव्यदिव्य प्रबोधन सोहळ्यात ह.भ.प. इंदूरीकर महाराज म्हणाले की, पालकांनी आपल्या मुलांना आध्यात्मिकतेकडे वळविणे ही काळाची गरज आहे. कारण मुले मोबाईलने बिघडत चालली आहे. तसेच गेममुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. व्यसन हे फॅशन बनले आहे. मुलांना संस्कार देण्यासाठी पसायदान शिकवा, ज्ञानेश्‍वरी वाचन करायला लावण्याचे त्यांनी आवाहन केले. तर वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहेत. कळस तुकाराम असून, विस्तार नामदेव असल्याचे त्यांनी सांगितले. वारकर्‍यांची सेवा करणे आणि मोठ्यांचे पाया पडणे हे पुण्य कधीच वाया जात नाही. मनाला, शरीराला चांगल्या सवयी लावून घ्याव्या. यामुळे मन शांत आणि शरीर निरोगी राहते. जीवनात आनंदाने राहण्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, स्थायी समिती माजी सभापती मनोज कोतकर, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक बाळासाहेब पवार, अ‍ॅड. धनंजय जाधव, दत्ता जाधव, अजय लामखडे, प्रशांत निमसे, घोसपुरीचे सरपंच प्रभाकर घोडके, नेप्तीचे माजी सरपंच संजय जपकर, सरपंच बाबासाहेब शिंदे, संजित क्षीरसागर, योगेश बिहानी, संतोष शेटे, भाऊ शेटे, पंचक्रोशीतील सर्व नागरिक, श्रीराम मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते व भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


पाहुण्यांचे स्वागत अशोक कोतकर, मच्छिंद्र कोतकर, उमेशराजे कोतकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष उरमुडे यांनी केले. आभार जालिंदर कोतकर यांनी मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *