डोंगरे यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी -आबासाहेब सोनवणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- पाच गावातील विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा पुर्ववत सुरु होण्यासाठी एसटी महामंडळाशी पाठपुरावा करुन सदर बस सेवा सुरु करुन दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा अहमदनगर जिल्हा सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हिंगणगाव ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच आबासाहेब सोनवणे, माजी उपसरपंच बाळासाहेब ढगे, संभाजी कोल्हे, उत्तम कांडेकर, निसार पठाण, गोरख पानसरे, नितीन खोडदे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या टाळेबंदीनंतर नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा बंद करण्यात आली होती. यामुळे नेप्ती, मौजे निमगाव वाघा, पिंपळगाव वाघा, हिवरेबाजार, दैठणे गुंजाळ येथून शहरात शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी व विविध कामानिमित्त येणार्या नागरिकांची गैरसोय होत होती. ही बस सेवा सुरु होण्यासाठी सरपंच परिषदेचे नगर तालुका सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी पाठपुरावा करुन पाच गावांचा प्रश्न सोडविला. डोंगरे आपल्या सामाजिक कार्यातून सर्वसामान्य ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना आबासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केली.
पै. नाना डोंगरे यांनी एका गावापुरते मर्यादीत राहून कार्य न करता, सर्व गावातील ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य सुरु आहे. विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.