यशश्री अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी बनवल्या शाडूच्या मातीपासून पर्यावरण पुरक गणपती
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या हरित सेनेच्या वतीने नगर-औरंगाबाद रोडवरील धनगरवाडी येथील यशश्री अकॅडमीत शाडूच्या मातीपासून पर्यावरण पुरक गणपती बनवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने श्री गणेश मुर्त्या बनविण्याची विनामुल्य कार्यशाळा घेण्यात आली. 550 शालेय विद्यार्थ्यांचा या कार्यशाळेस उत्सफुर्तपणे प्रतिसाद लाभला. शाडूच्या मातीपासून इकोफ्रेंडली बीजगणेश मुर्त्या साकारुन या मुर्त्यांची घरी प्रतिष्ठापणा करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
ही कार्यशाळा विभागीय वन अधिकारी परवीन पठाण, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप जिरे, हरियालीचे सुरेश खामकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यशाळेसाठी हरियाली संस्थेचे सहकार्य लाभले. यावेळी यशश्री अकॅडमीचे संस्थापक सदस्या अमृता शर्मा, उपाध्यक्ष यश शर्मा, व्यवस्थापक प्रज्ञा जोशी, प्राचार्य कीरील पंडित, वनपाल अतुल बोरुडे उपस्थित होते. कार्यशाळेत मुर्तीकार धनंजय शिरसाठे व तेजस्वी देशपांडे यांनी शाडुमातीपासुन गणपती बनवण्याचे प्रात्याक्षिक दाखवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
परवीन पठाण म्हणाल्या की, धार्मिक कार्यक्रम व उत्सवांना सामाजिक जोड दिल्यास बदल घडणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मुर्त्यांच्या विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होते. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मुर्त्या पर्यावरणपुरक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुरेश खामकर यांनी प्रत्येक सण-उत्सव साजरा करताना निसर्ग व पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. पर्यावरणाचे प्रश्न बिकट होत चालले असून, या चळवळीत सर्वसामान्य नागरिकांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.