नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून, त्यांना धैर्य व आत्मविश्वास दिला -बाळासाहेब पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भिती व मनातील दडपण दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.1 एप्रिल) परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांशी थेट संवाद संवाद साधला. नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षेपण शहरातील जन शिक्षण संस्थेच्या वतीने नालेगाव येथील मुख्य कार्यालय, गांधी मैदान येथील प्रगत विद्यालय, मुकुंदनगर व पाईपलाइन रोड येथील केंद्रावर करण्यात आले होते. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण पहाण्यासाठी विद्यार्थी व संस्थेतील प्रशिक्षणार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना परीक्षेमुळे येणारा ताण कसा कमी करायचा, प्रेरणेसाठी काय करायचे, पालकांना स्वप्ने कशी समजावून सांगायची अशा अनेक प्रश्नांना थेट उत्तरे देऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. परीक्षेला सण बनवून त्यात रंग भरण्याचे आवाहन केले. तर परीक्षा हा जीवनाचा जन्मजात भाग असून, त्याला न घाबरता सामोरे जाण्याचे आवाहन केले. अनुभवांना ताकद बनवा व जे करत आहात त्यावर विश्वास ठेवण्याचा कानमंत्र त्यांनी दिला.
शहरात जनशिक्षण संस्थेच्या वतीने परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे करण्यात आलेल्या लाईव्ह प्रेक्षपणप्रसंगी जन शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, प्रगत विद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य सुनिल पंडित, उपशिक्षिका एस.जी. सब्बन, मनोहरलाल सबलोक, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, अनिल तांदळे, महिला प्रशिक्षका कविता वाघेला, ममता गड्डम, माधुरी घाटविसावे, नाजिया शेख, प्रियंका साळवे आदी उपस्थित होते.
प्राचार्य सुनिल पंडित म्हणाले की, परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांवर मोठे दडपण असते. पालकांच्या अपेक्षा व अभ्यासाचा ताण यामुळे भितीयुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातात. त्यांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
जन शिक्षण संस्थेचे बाळासाहेब पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून, त्यांना एक प्रकारे धैर्य व आत्मविश्वास देण्याचे काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी त्यांनी साधलेला संवाद कौतुकास्पद असून, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांना योग्य रितीने समजवले. विद्यार्थी परीक्षेला न घाबरता सामोरे जाण्यासाठी त्यांच्या प्रेरणेने सज्ज झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.