भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरात संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्रीराम विजय ग्रंथ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन 4 ते 11 एप्रिल पर्यंत करण्यात आले आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेला हा धार्मिक सोहळा यावर्षी चालू होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा सोहळा भाविकांसाठी मोठी पर्वणी ठरतो, सोहळ्यानिमित्त मंदिर परिसर स्वच्छ करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
सोहळ्याचे हे 33 वे वर्षे आहे. सोमवारी 4 एप्रिल रोजी रात्री 8:30 ते 11:30 या वेळेत कथा प्रवक्ते श्यामसुंदर महाराज नानेकर पीठ प्रमुख व परमपूज्य साधूबाबा ब्रह्म संस्थान कामरगाव (ता. नगर) हे दि.4 ते 9 एप्रिल दरम्यान अनुक्रमे श्रीमद् भागवत महात्म्य, गोकर्ण कथा, भागवत कथा, नारद चरित्र, राजा परीक्षीतिला शाप, विदुर चरित्र, आजामिळ कथा, वृषभदेव, ध्रुव कथा, राजा अंबरिश कथा, श्री राम कथा, कृष्ण जन्म वृंदावन लीला आदी प्रसंगाचे वर्णन करून कथा सांगणार आहेत.
रविवार 10 एप्रिल रोजी राजेंद्र महाराज कुर्हे यांचे सकाळी 10 ते 12 या वेळेत रामजन्माचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी सुदाम चरित्र कथा सांगितली जाईल. सोमवार 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत श्यामसुंदर महाराज नानेकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. काल्याचे किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.