नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम
मैदानावरील खेळाडू जीवनाच्या रणांगणात यशस्वी -किसन वाबळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस कबड्डी स्पर्धेने साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयात नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचा थरार रंगला होता. या स्पर्धेत शालेय मुला-मुलींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यामध्ये नवनाथ विद्यालयाचा इयत्ता दहावी मुला-मुलींचा संघ विजयी ठरला.
कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, अशोक डौले, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, तुकाराम खळदकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, लहानबा जाधव आदींसह शालेय विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किसन वाबळे म्हणाले की, मैदानी खेळाने शरीर निरोगी राहून खेळाडूवृत्ती वृध्दींगत होते. मैदानावरील खेळाडू जीवनाच्या रणांगणात यशस्वी होत असतो. खेळाने सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक भेद दूर होतात. एकसंघपणे खेळाडू मैदानावर येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पै. नाना डोंगरे यांनी खेळाने जीवनात यश-अपयश पचविण्याची क्षमता निर्माण होते. खेळाला चांगले दिवस आले असून, ग्रामीण भागातील अनेक खेळाडू यामध्ये करिअर घडवित असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेसाठी पंच म्हणून चंद्रकांत पवार व नाना डोंगरे यांनी काम पाहिले. विजेत्या संघास नेहरु युवा केंद्राच्या वतीने स्मृतीचिन्ह व सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.