अपंगत्वावर मात करीत अनेक दिव्यांगांनी यशाची शिखरे गाठली -साहेबराव बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मविश्वासाने जग जिंकता येते. मनाच्या शक्तीपेक्षा कोणती शक्ती मोठी नसून, ठरविल्यास यश प्राप्ती सहज शक्य आहे. अपंगत्वावर मात करीत अनेक दिव्यांग बांधवांनी यशाची शिखरे गाठली आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वत:ला कमी न लेखता आपल्यातील गुणवत्ता सिध्द करुन प्रगती साधण्याचे आवाहन नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बोडखे यांनी केले. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी कौतुक केले.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, सावली दिव्यांग संघटना व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोडखे बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, गोरख चौरे, बाहुबली वायकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदींसह शिक्षक उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये काही कमी असल्याचा न्यूनगंड बाळगू नये. काही कमी असल्यास काही विशेष शक्तींची देणगी ईश्वर देत असतो. स्वत:मधील क्षमता ओळखून जीवनाचे ध्येय गाठण्याचा संदेश देत, रडायचे नाहीतर लढण्याचा कानमंत्र त्यांनी दिला. तर सर्व गरजू विद्यार्थ्यांच्या पाठिशी डोंगरे संस्था उभी राहणार असल्याचे स्पष्ट केले.
बाबासाहेब महापुरे यांनी दिव्यांग विद्यार्थी समाजातील एक घटक असून, त्यांना प्रवाहात आनण्यासाठी आधार देण्याची गरज आहे. दिव्यांगांना सहानुभूतीची गरज नसून, प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांगांसाठी सुरु असलेल्या विविध कार्याची माहिती त्यांनी दिली.