घरी राहून विद्यार्थ्यांना घडले दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- तंत्रज्ञानाने जग झपाट्याने बदलले असताना, कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पध्दती पुढे आली. या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शहरातील प्रयोगशील शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी दिल्लीत उपस्थित राहून प्रत्यक्षरीत्या तेथील राष्ट्रीय युद्ध स्मारक (नॅशनल वॉर मेमोरियल) व पुराना किल्ल्यावरून व्हर्च्युअल पद्धतीने शहराच्या सावेडी येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना इतिहास व मराठी विषयाशी संबंधित ऐतिहासिक वास्तू व स्मारके यांचे प्रत्यक्ष प्रसारण घडवून त्याची माहिती दिली. सुमारे प्रत्येकी दीड तासांच्या ऑनलाईन पाठांमध्ये दररोज शाळेतून शिकवणारे शिक्षक आज दिल्लीतून संबंधित विविध वास्तू/वस्तू तसेच इतिहासाची भौतिक, लिखित शैक्षणिक साधने दाखवत शिकवत आहेत, हे पाहून मुले हरखून गेली. विषय घटकांच्या संबंधित पूरक माहिती सचित्र व ऑनलाइन व्हिडीओ पाहताना त्यांच्या चेहर्यावर समाधान झळकत होते.
भारताचे संविधान भाग-4 क मधील नागरिकांची मूलभूत कर्तव्य यातील अनुच्छेद 51-क मधील मूलभूत कर्तव्ये यांचा आदर्श वस्तुपाठ डॉ. बागूल यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून दिला. यात राष्ट्र प्रतिकांचा आदर, भारतीय संस्कृतीच्या वारशाचे जतन, मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टीबद्दल सांगितले.
विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा व प्रशिक्षणांच्या निमित्ताने दिल्लीमध्ये वास्तव्यास असताना बागुल यांनी शिकवण्याचे विषय घटक व त्या घटकांशी संबंधित दिल्लीतील विविध ऐतिहासिक प्रेरणादायी स्थळे व वेळ व ऑनलाइन तसेच ऑफलाइन परवानगी नियमांचे नियोजन केले होते. इयत्ता सातवी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील थोरांची ओळख डॉ.खानखोजे-(पाठ 6 वा,लेखिका वीणा गवाणकर), अनाम वीरा (पाठ 13 वा कविता, कवी कुसुमाग्रज), धोंडा (पाठ 19 वा, लेखक डॉ संजय ढोले-दगडांचे नमुने), जय जय महाराष्ट्र माझा (पाठ 1 ला-कवी राजा बढे ) या विविध पाठांशी संबंधित क्रांतिकारक शहीद सैनिक तसेच सशस्त्र सेना यांचा सन्मान करण्यासाठी उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, परमवीर चक्र प्राप्त सैनिकांची स्मारके, शस्त्रास्त्रे व बंदूका संग्रहालय, 15 मीटर उंचीचा वीर जवान स्तंभ, अमर चक्र, वीरता चक्र, त्याग चक्र, रक्षक चक्र तसेच विविध युद्धांमध्ये भारताच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या 26 हजारांहून अधिक भारतीय सैनिकांची प्रेरणादायी नावे कोरलेली भव्य वर्तुळाकार वास्तू आदी ठिकाणी बागुल यांनी स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने गुगल मीट, फेसबुक लाईव्ह आदी ऑनलाइन साधनांच्या मदतीने या पाठांचे प्रत्यक्ष शैक्षणिक साधन दाखवले. डॉ पांडुरंग खानखोजे हे गदर क्रांतीचे प्रणेते व मेक्सिको शेतीतले जादूगार होते.
तसेच इयत्ता सहावी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील इतिहासाची साधने, हडप्पा संस्कृती, जनपदे आणि महाजनपदे, दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये, मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये, मौर्यकालीन भारत तसेच भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील खडक व खडकांचे प्रकार या पाठांशी जवळपास संबंधित असलेल्या दिल्लीच्या पुराना किल्ल्यामधील ऐतिहासिक अवशेष, पुरातन अवशेषांचे संग्रहालय, खीलाये पोहना मज्जिद, शेर मंडल, वायूचे पुस्तकालय, महाभारत कालीन वस्तूंचे संग्रहालय, खैरुल मंजिल मशीद, तलाकी दरवाजा, दक्षिणी दरवाजा या ठिकाणी प्रत्यक्षरीत्या जाऊन संबंधित ई-शैक्षणिक साहित्य ऑनलाईन दर्शवले. या उपक्रमाबद्दल शिक्षणाधिकारी (माध्य.) अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथ) भास्कर पाटील, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्रीराम थोरात, श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन अॅड. किशोर देशपांडे, मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक, विद्यार्थी आदींचे सहकार्य व शुभेच्छा लाभल्या.