अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मिहीर राजेंद्र ढसाळ याने पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात नुकतेच पार पडलेल्या आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स 2022 स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकाविले. या स्पर्धेत भारतासह अनेक देशातून स्पर्धक सहभागी झाले होते. ढसाळ यांने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत मेन्स फिजिक्स मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
मिहीर ढसाळ हा गुलमोहर रोड येथील असून, त्याने यापुर्वी देखील शरीर सौष्ठव व मेन्स फिजिक्स स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन 180 सेमीच्या उंचीच्या गटात पदक मिळवले आहे. आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत त्याने केलेली कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली आहे. मेन्स फिजिक्स ही स्पर्धा शरीर सौष्ठव स्पर्धेसारखी असून, यामध्ये शरीर सौष्ठवपटूचा गट हा उंचीवर अवलंबून असतो. तर त्याला आपल्या बॉडीचे प्रदर्शन हाफ पँटवर करावे लागले. यामध्ये कंबरेच्या वरच्या बाजूची बॉडी पाहून गुणांकन दिले जाते. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.