दोन लाख रुपये व दुबईची ट्रिप बक्षीस
चंदिगढला रंगला होता फॅशनचा जलवा
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पातळीवर झालेल्या मॉडलिंग स्पर्धेत नगरचा प्रज्वल जितेंद्र भिंगारदिवे यांनी मिस्टर इंडिया इंटरनॅशनल स्टार 2022 चा बहुमान पटकाविला. एन.एफ.एम.जी. प्रोडक्शन प्रजेंटस मिस्टर अॅण्ड मिस इंडिया इंटरनॅशनल स्टार 2022 या स्पर्धेचे डायरेक्टर गौरव राणा आणि को पॉवर्डबाय चंदिगढ युनिव्हर्सिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भिंगारदिवेसह नगरच्या इतर मॉडेल्सही टॉप फायनल पर्यंत गेले.
चंदिगढ येथे नुकतीच ही मॉडलिंग स्पर्धा पार पडली. यामध्ये देशभरातून एक हजार पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. गेल्या वर्षापासून संपूर्ण भारतामधून फॅशन शो, मॉडलिंग तसेच बॉलीवूड विश्वातील दिग्गजांच्या प्रशिक्षणा मधून ग्रॅण्ड फिनालेसाठी शंभर स्पर्धक निवडण्यात आले होते. या शंभर मधून विजेता ठरलेला टायटल विनर नगरच्या आयकॉनिक मॉडलिंग इन्स्टिट्यूटचा प्रज्वल भिंगारदिवे ठरला आहे. स्पर्धेतील विजेता भिंगारदिवे याला दोन लाख रुपये व दुबईची ट्रिप बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून त्याने शहराचे नांव देशपातळीवर उंचावले आहे. या स्पर्धेत इन्स्टिट्यूटचे वृषाली वारकड हिने बेस्ट परफेक्ट रॅम्प वॉकचा किताब पटकावला, तर धनश्री वाघ, अनन्या इथापे, स्वप्निल काळे, उझेर शेख,सोना बगारे, प्रेम गोलांडे या स्पर्धेतील टॉप फायनलिस्ट होते. या मॉडेल्सना आयकॉनिक मॉडलिंग इन्स्टिट्यूटचे संचालक स्वप्नील भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेत यश मिळवून परतलेल्या मॉडेल्सचा शहरात जंगी स्वागत करण्यात आले. या स्पर्धेसाठी सर्व मॉडेल्सना साहिल बागवान, संकेत शिंदे, सोन्या रणदिवे, रबनवाज सुभेदार यांचे विशेष सहकार्य लाभले. भिंगारदिवे याने या यशामागे आई-वडील, गुरुजन, मार्गदर्शक व सर्व मित्र परिवाराचा मोठा वाटा असल्याची भावना व्यक्त केली. या स्पर्धेचे परीक्षण मिस्टर वर्ल्ड 2016 रोहित खंडेलवाल, बिग बॉस फेम सारा गुरपाल व एम टिव्ही फेम सागर आनंद यांनी परीक्षण केले. भिंगारदिवे गेल्या एक वर्षापासून या स्पर्धेची तयारी करत होता. या स्पर्धेसाठी फिटनेस, डान्स, अॅक्टिंग आणि फॅशन या गोष्टींसाठी प्रज्वलने दिवस-रात्र कष्ट केले. डान्ससाठी विक्टर डान्स अकॅडमीतर्फे त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व ओबीसी सेलचे अमित खामकर, सामाजिक कार्यकर्ते अकलाख शेख यांनी भिंगारदिवे व इतर मॉडेल्सचे अभिनंदन केले.