दहावी बोर्डाच्या सर्व परीक्षा केंद्रांना पोलीस बंदोबस्त द्यावा
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 950 केंद्रावर 70 हजार 950 विद्यार्थ्यांची मंगळवार (दि.15 मार्च) पासून इयत्ता दहावी बोर्डाची (एसएससी) परीक्षा होत असून, गैरप्रकार टाळण्यासाठी व शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने प्रत्येक परीक्षा केंद्रास पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी संध्याकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा समोर हा गंभीर प्रश्न उपस्थित करुन शिक्षण विभागाचे अधीक्षक सुभाष कराळे यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, बद्रीनाथ शिंदे, रमाकांत दरेकर, विठ्ठल काळे, देवीदास पालवे, सतीश सातपुते, महेश शेळके, चंद्रकांत बर्डे, बाळासाहेब निवडुंगे, राहुल झावरे, महेश दरेकर, रविंद्र गावडे, प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते.
कोरोना परिस्थितीमुळे सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा हीच त्यांचे परीक्षा केंद्र आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांची आपल्या शाळेतच परीक्षा होणार आहे. मागील काही वर्षापासून बोर्डाच्या परीक्षांमध्ये कॉपीचे व इतर गैरप्रकाराला शिक्षकांनी विरोध केल्यास त्यांच्यावर हल्ले होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. अनेक तालुक्यात केंद्रप्रमुखांना परीक्षा काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बोर्डाच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी व शिक्षकांना संरक्षण देण्याची पोलीस बंदोबस्ताची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शिक्षकांनी कोरोना काळात पोलीसांच्या खांद्याला खांदा लाऊन योगदान दिले. परीक्षेच्या काळात शिक्षकांना सहकार्य करण्याची अपेक्षा असून, इयत्ता दहावी बोर्डाच्या सर्व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.