पालकांनी किशोरवयीन मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करून संवाद वाढवावा -डॉ. महेश मुळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- पालकांनी किशोरवयीन मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करुन, प्रत्येक गोष्ट हितगूज केली पाहिजे. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी मुला-मुलींशी मैत्रीपुर्ण संवाद आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. महेश मुळे यांनी केले.
तक्षिला स्कूलमध्ये, वयात येणार्या मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शनवर व्याख्यानात डॉ. महेश मुळे बोलत होते. या कार्यक्रमात तारुण्यावस्थेकडे मार्गक्रमण करताना किशोरवयीन मुला व मुलींना त्यांच्यात होणार्या शारीरिक व मानसिक बदलांचे शास्त्रीय ज्ञान देऊन समज-गैरसमजबद्दल यांच्या बाबतीत चर्चासत्र करण्यात आले. या कार्यशाळेत इयत्ता नऊवी ते बारावीच्या मुला-मुलींनी सहभाग नोंदवला.
मुलांना डॉ. महेश मुळे यांनी, आणि मुलींना डॉ. सौ. अंशू मुळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व सांगून, सकस आहाराची माहिती देण्यात आली. डॉ. अंशू मुळे यांनी कळी उमलताना किंवा वयात येताना येणार्या समस्यांवर मात करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्राचार्या जयश्री मेहत्रे यांनी किशोरवयीन मुलांना लैंगिक शिक्षणाबरोबर त्यांच्या क्षमता व जबाबदार्यांची देखील थोडी जाणीव करुन दिल्यास त्यांच्यामध्ये समजुतदारपणा निर्माण होईल असे भाष्य केले.
येणार्या पिढीचे जबाबदार नागरिक घडवण्याच्या कार्यात आपल्या स्कूलचा एक महत्त्वाचा वाटा आहे याचे भान राखून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक तनवीर खान व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.