गुट्टलबाज सत्तापेंढारी व भ्रष्ट शासन पध्दती विरोधातील लढा जारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील मनुशोषित व भ्रष्ट शासन पद्धती मोडित काढण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राबविलेले कार्य पुढे चालविण्यासाठी त्यांच्या जयंती दिनी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने हुतात्मा स्मारकात महाडिच्चू कावा गॅझेट प्रसिध्द करण्यात आले. यावेळी अॅड. कारभारी गवळी, वीरबहादूर प्रजापती, सुधीर भद्रे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, रईस शेख, विजय भालसिंग, राशी प्रजापती, इंजी. प्रेरणा थोरात, शाहीर कान्हू सुंबे, आनंदा आढाव, गीता डहाळे, कारभारी वाजे, नंदा साबळे, बलभीम पाटोळे, तुकाराम बोरगे, स्मिता पद्मा, विठ्ठल सुरम आदी सहभागी झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन या चळवळीची सुरुवात करण्यात आली. या चळवळीच्या माध्यमातून गुट्टलबाज सत्तापेंढारी विरोधात डिच्चू कावा व ऑपरेशन पर्यायचा स्विकार करण्याचे आवाहन करण्यात आले. देशाला 75 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले. लोकशाही आणि प्रजासत्ताक शासन पद्धती देशात अमलात आली. मात्र आजही बहुसंख्य मतदार जात, धर्म, पंथाचे आहारी जाऊन गुट्टलबाज सत्तापेंढार्यांना मतदान करतात. हे सत्तापेंढारी जातवाहक आणि लाचवाहकाचे काम करुनपैसा, दारु, कोंबडीच्या अमिषाने मतदारांना खिशात घालतात. गुट्टलबाज सत्तापेंढारी मतदारांना मेंढरं समजून त्यांचे शोषण करतात. या देशात खर्या अर्थाने प्रजासत्ताकाची अंमलबजावणी जनतेला करता आलेली नाही. त्यामुळे प्रशासनामध्ये भ्रष्टाचार, टोलवाटोलवी, अनागोंदी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.
अॅड. कारभारी गवळी म्हणाले की, शहराची परिस्थिती गंभीर असून, गुट्टलबाज सत्तापेंढारी आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकार्यांमुळे शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. शहराची अवस्था खेड्यापेक्षा वाईट झाली आहे. पिण्यासाठी पाणी नाही, व्यवस्थित रस्ते नाही, युवकांना रोजगार नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षे सुरू असलेल्या मनुशोषित कायदा आणि शासन पद्धतीला कायमचा डिच्चू दिला आणि या देशात भारतीय संविधान आणले. परंतु देशात मतदार आणि सत्तापेंढार्यांकडे उन्नतचेतना व स्वत:चे हित साधण्याच्या लोभापायी हे तत्त्वज्ञान प्रभावी ठरु शकले नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, याची जाण सत्तापेंढार्यांना राहिलेली नाही. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी सत्तापेंढारी मतदारांचे शोषण करत आहे. यासाठी ऑपरेशन पर्यायाने क्रांती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक सब्बन यांनी देशात लाखोंच्या संख्येने तरुण बेरोजगार आहेत. कोट्यावधी लोकांना राहण्यासाठी निवारा नाही. बाबासाहेबांनी सामान्य माणसाच्या कल्याणासाठी संविधान निर्माण केले. जातिव्यवस्था संपवण्यासाठी मोठे यश मिळवले. आज सुशिक्षित माणसे देखील भ्रष्टाचार, टोलवाटोलवी, अनागोंदी आणि जातीवादामध्ये अडकलेली आहेत. ऑपरेशन पर्यायाने भ्रष्टाचाराने किडलेले शासन पद्धतीला दूर करण्यासाठी ऑपरेशन पर्याय सर्वोत्तम मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रकाश थोरात म्हणाले की, दोन वर्षाच्या कोरोना महामारीनंतर जनतेला महागाई व लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डिच्चू कावा व ऑपरेशन पर्याय हे संविधानाद्वारे दिलेले प्रभावी शस्त्र असून, या तंत्राचा वापर करुन सक्षम भारत घडविण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.