अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- टेकुडवाडी (ता. पारनेर) येथील अवैध वाळू उपसा सर्रास सुरु असून, सदर जागेचा पंचनामा करुन वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.
पारनेर तालुक्यातील मौजे टेकुडवाडी येथे शेतकर्यांच्या शेत जमिनीतून बेकायदा अवैध वाळू उपसा सुरु आहे.गट नंबर 312 व 313 येथे झालेल्या अवैध वाळू उपसाचे त्वरित पंचनामा करण्याचे आदेश देऊन, संबंधित वाहनांवर कारवाई करून वाहन जप्त करण्यात यावे, संबंधित शेतकर्याच्या जागेचे पंचनामे करून बेकायदा वाळू उपसा केल्याने गुन्हा दाखल करावा, अवैध वाळू उपसाप्रकरणाला पाठिशी घालणार्या मंडलाधिकारी व तलाठींवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
पारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसाबाबत गेल्या दीड वर्षापासून तक्रारी करूनही अद्याप पर्यंत पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर येथील मंडलाधिकारी व तलाठी या कामाला पाठबळ देत असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे. अनेकवेळा तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने पारनेर येथील अवैध वाळू उपसाबाबत महसुल मंत्री यांच्या निवासस्थानी संगमनेर येथे उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष रोडे व कासुटे यांनी दिला आहे.