सैनिक समाज पार्टीचे जिल्हा न्यायाधीशांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा न्यायालयाच्या आवारात पार्किंगचा अंदाधुंद कारभार सुरु असल्याचा आरोप करीत, पार्किंगचे पैसे फक्त पक्षकार व नागरिकांकडून वसूल न करता सर्वांकडून समान पध्दतीने घेऊन पार्किंग व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पक्षाचे राज्य सचिव अरुण खिची यांनी मंगळवारी (दि.15 मार्च) प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश यांना दिले.
जिल्हा न्यायालय आवारात पक्षकार व नागरिकांकडून वाहन लावल्यापोटी पार्किंगचे दहा रुपये वसुल केले जात आहे. न्यायालयात पार्किंग सुविधांची आवश्यकता असून, त्यास विरोध नाही. परंतु सदर पार्किंगचे पैसे फक्त न्यायालयात येणार्या पक्षकार बांधव, नागरिकांकडून वसूल केले जात आहे. वकील व इतर न्यायालीन अधिकारी, कर्मचारी यांना मात्र सुट देण्यात आली आहे. सदरची बाब ही कायदा व न्यायतत्त्वांशी सुसंगत नाही. वकील व्यावसायिक असून, पक्षकार कडून फी घेतात. तसेच न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी यांना सुद्धा शासकीय पगार आहे. त्यामुळे पार्किंगचा भुर्दंड फक्त सर्वसामान्यांवर अन्यायकारक पध्दतीने लादू नये. दिल्या जात असलेल्या पावतीवर कोणाची सही नाही, त्या पावती पुस्तकात कार्बन कॉपी नसून, अंदाधुंद कारभार चालविला जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जिल्हा न्यायालयाच्या आवारात सर्वांकडून समान पध्दतीने पार्किंगचे पैसे वसुल करुन पार्किंग व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.