गरजूंना छत्री व चष्म्यांचे वाटप
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गरजू घटकातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करुन गरजूंना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. जातेगाव येथे झालेल्या या कार्यक्रमात वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. तसेच शहरातील रस्त्यांवर थांबून उपजिविका भागविणार्या कामगारांना ऊन व पावसाच्या संरक्षणासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा अंबिका बनसोडे, सचिव डॉ. धनाजी बनसोडे, नेत्ररोग तज्ञ डॉ.रणजीत सानप, डॉ. मोनेरिया शेख, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग तिडके, डॉ. संजय कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समीर आढाव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
अंबिका बनसोडे म्हणाल्या की, ग्रामीण भागात आरोग्यसेवेची मोठी गरज आहे. यासाठी शेवटच्या घटकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळण्यासाठी वाडी-वस्तीवर जाऊन शिबीर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. धनाजी बनसोडे यांनी जिजाऊ वेल्फेअर फाऊंडेशन सामाजिक भावनेने वंचितांचे प्रश्न सोडविण्यासह त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर कार्य करत आहे. सण-उत्सवाच्या निमित्ताने विविध आरोग्य शिबीर घेऊन गरजूंना आरोग्यसेवा पुरवली जात आहे. स्वातंत्र्याच्या महोत्सवी वर्षात विविध सामाजिक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबीरात नेत्ररोग तज्ञ डॉ.रणजीत सानप यांनी रुग्णांची तपासणी केली. यामध्ये 45 ग्रामस्थांच्या मोतीबिंदूचे निदान करुन 85 गरजू लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. गावात विविध ठिकाणी 250 झाडे लावण्यात आली. तसेच रस्त्यावर काम करणार्या 35 गरजूंना संस्थेच्या वतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा रॅली काढून विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, अपंग व माजी सैनिकांना तिरंगा ध्वजचे वाटप करण्यात आले होते.