पर्यावरण पूरक गणपती बसवा व निसर्गाचे संरक्षण करा.. हा संदेश देत राबविला उपक्रम
लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना गणेश मुर्त्यांचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त शहर व परिसरात भाविकांना शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे मोफत वितरण करण्यात आले.
पर्यावरण पूरक गणपती बसवा व निसर्गाचे संरक्षण करा…, हा संदेश देत फाउंडेशनच्या अध्यक्षा अंबिका बनसोडे व सचिव धनाजी बनसोडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
घरोघरी व कार्यालयांमध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होण्याच्या उद्देशाने मंगळवारी (30 ऑगस्ट) हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार संग्राम जगताप, धर्मदाय आयुक्त वंदना पाटील-चव्हाण व उपजिल्हाधिकारी पाटील यांना या अभियानांतर्गत शाडू मातीच्या गणेश मुर्त्या भेट देण्यात आल्या.
तसेच शहर व उपनगरात 65 शाडूच्या मुर्त्यांचे वितरण नागरिकांना करण्यात आले. नागरिकांनी या मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना करुन पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर ही मूर्ती बहुतांशी काळ पाण्यात विरघळत नाही, यातून नदी, विहीर व पाण्याचे स्त्रोत असलेल्या तळ्यात प्रदूषण वाढते. तर मूर्तीची विटंबना देखील होते. त्यामुळे घरोघरी माती पासून तयार केलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे आवाहन फाउंडेशनचे सचिव डॉ. धनाजी बनसोडे यांनी केले आहे
. फाउंडेशनच्या माध्यमातून भाविकांना शाडू मातीच्या गणेश मुर्त्या देण्याचा मागील चार ते पाच वर्षापासून राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्षा अंबिका बनसोडे यांनी दिली.