घोडके दांम्पत्यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव
आरोपींपासून सुरक्षा होण्याची केली मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्नीचा विनयभंग करुन कुटुंबीयांना मारहाण करणार्या फरार आरोपींपैकी काहींना अटकपुर्व जामीन मिळाला असून, तर उर्वरीत आरोपी मोकाट फिरत असताना त्यांच्यापासून जीवितास धोका निर्माण झाला असून, त्यांच्याकडून कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने प्रमोद घोडके व त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन निवेदन दिले. तर फरार आरोपींना अटक करुन जामीनवर सुटलेल्या आरोपींपासून सुरक्षा होण्याची मागणी केली आहे.
6 मे रोजी जेवणानंतर सावेडी, वैदुवाडी येथे घराबाहेर फिरण्यास निघाले असताना प्रमोद घोडके यांच्या पत्नीची काही गुंडांनी छेड काढली. त्यांना विरोध केले असता, याचा राग मनात धरून धनवंत दिघे उर्फ बाळ्या, विक्रांत दिघे उर्फ भावड्या, यश राहणे, योगेश देशमुख, धनवंत दिघेची आई छायाबाई व इतर अनोळखी चार व्यक्तींनी मिळून प्रमोद घोडके यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या पत्नीला देखील मारहाण करून अश्लील गैरवर्तन करण्यात आले.
या प्रकरणी 7 मे रोजी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आरोपींवर अॅट्रोसिटीचा वाढीव कलम लावण्यात आले. 21 ऑगस्ट रोजी विक्रांत दिघे याने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी सुड घेण्यासाठी तयारीत असून, त्यांच्या पासून कुटुंबीयांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आरोपींकडून कोणत्याही कुटुंबातील सदस्याचा घातपात होण्याची व खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. फरार आरोपींना त्वरीत अटक करावी, जामीनवर सुटलेल्या आरोपींना समज द्यावी व पोलीस संरक्षण देण्याची मागणी घोडके दांम्पत्यांनी केली आहे. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.