पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे स्पष्टीकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगून जातीय दंगली घडविणार्या गुट्टलबाज सत्तापेंढारी यांना कॉ. गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाने लगाम लावला आहे. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेसमोर आला असून, भिवंडी, मालेगाव आणि अहमदनगर येथे तीस ते चाळीस वर्षापूर्वी दरवर्षी होणार्या जातीय दंगली पूर्णपणे थांबल्या आहेत. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास ज्ञात करुन, धर्मनिरपेक्ष, भ्रष्टाचारमुक्त समाज घडविण्यासाठी जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्र स्विकारण्याचे पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
जातीय दंगली थांबण्यासाठी कॉ. पानसरे यांचे शिवाजी कोण होता? हे पुस्तक कारण ठरले. जात आणि धर्माच्या नावावर गुट्टलबाज सत्तापेंढार्यांनी सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सातत्याने वापर केला. कॉ. गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजीमहाराज धर्मनिरपेक्ष होते, ही बाब तमाम जनतेच्या लक्षात आली. महाराजांनी कोणत्याही विशेष जातीला जवळीक केली नाही आणि इतर जातीच्या लोकांना दूरही ठेवले नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एकाधिकार निर्माण करुन धर्म आणि जातीच्या वापरातून सत्तापेंढारी यांनी स्वातंत्र्योत्तर काळात पन्नास वर्षे सत्ता भोगली. परंतु यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कोणालाही गैरफायदा घेता येणार नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जय शिवाजी, जय डिच्चू कावा या महामंत्राच्या मदतीने देशांमध्ये जातीच्या नावावर किंवा धर्माच्या नावावर कोणालाही राज्य करता येणार नाही. त्याचबरोबर भ्रष्टाचार आणि अनागोंदी करणार्यांना जनता घरी पाठवल्या शिवाय राहणार नाही. जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्र शिवाजी कोण होता? या ग्रंथातून तमाम भारतीयांना उपलब्ध झाले आहे. यापुढे भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवाटोलवी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा पुढारीला करता येणार नाही. त्याचबरोबर नोकरशाहीचे जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्राने धाबे दणाणले आहेत. समाजाच्या किंवा देशाच्या हिताला बाधा असणार्या कोणत्याही घटकाला सार्वजनिक जीवनात स्थान राहणार नसल्याचे म्हंटले आहे.
यापूर्वी चुकीचा इतिहास सांगून शिवाजी महाराज विशिष्ट धर्माविरोधात लढले हा गैरसमज पसरविण्यात आला. त्यातून राजकीय पुढार्यांनी जातीय दंगली पेटवून स्वत:ची पोळी भाजली. मात्र शिवाजी कोण होता? या पुस्तकाने सर्वांपुढे महाराजांचा खरा इतिहास आणल्याने जातीयवादाचे बीज पेरणार्यांना धडा मिळाला असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, यमनाजी म्हस्के, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.