शालेय परिसरात 55 झाडांची लागवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने निंबोडी (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळा व रेणुका माध्यमिक हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील ऐतिहासिक, पर्यटन स्थळ, डोंगररांगा, उजाड माळरानं हिरवाईने फुलविण्यासाठी वृक्षांची लागवड करुन त्याच्या संवर्धनाचे कार्य हाती सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली.
या वृक्षरोपण अभियानात माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विक्रम बेरड, मुख्याध्यापक डी.बी. पवार, डी.एस. सरोदे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सुनील साठे, अंतोन पवार, कडूस, बोरुडे, सौ. देशमुख, शिंदे, ढगे, साके, जय हिंदचे शिवाजी पालवे, संजय पाटेकर, शिवाजी गर्जे, शिवाजी पठाडे, काशिनाथ बेरड, रामकिसन शिंदे, दगडू कराळे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
या अभियानातंर्गत विविध प्रकारच्या 55 झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये चिंच, जांभळ, करंजी, आंबा, वड या झाडांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपणामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. मुख्याध्यापक डी.बी. पवार यांनी शाळेचा परिसर हिरवाईने नटल्यास वातावरण सुंदर व प्रसन्न राहणार असून, फळझाडे असल्याने भविष्यात मुलांना फळे देखील मिळणार असल्याचे स्पष्ट केले.
शिवाजी पालवे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षरोपण व संवर्धनाचे महत्त्व समजल्यास या चळवळीला गती येणार असल्याचे स्पष्ट केले. शालेय विद्यार्थ्यांनी लावलेली सर्व झाडे जगविण्याचा संकल्प व्यक्त केला.
मेजर विक्रम बेरड यांनी जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभर माजी सैनिक करत असलेल्या वृक्षरोपण अभियानाची माहिती दिली. आभार मेजर संजय पाटेकर यांनी मानले.