• Wed. Dec 11th, 2024

जगातील सर्वात अवघड दक्षिण आफ्रिकेच्या मॅरेथॉनमध्ये शहरातील रनर्सचा डंका

ByMirror

Sep 1, 2022

टकले, खंडेलवाल, बनकर व पालवे यांनी पटकाविले कास्य पदक

भारतीय रनर्सच्या प्रोत्साहनासाठी महात्मा गांधी यांची नात इला गांधी यांची हजेरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जगातील सर्वात जुनी व अवघड असणार्‍या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धेत येथील एसपीजे स्पोर्टस क्लब व नगर रायझिंगच्या चार रनर्सनी सहभाग नोंदवून कास्य पदक पटकाविले. नुकतीच ही स्पर्धा पीटरमार्टित्झबर्ग ते डर्बन या दोन शहराच्या 90 किलोमीटरच्या खडतर अंतरादरम्यान पार पडली.


यामध्ये किशोर टकले (9 तास, 32 मिनीट), रितेश खंडेलवाल (11 तास, 28 मिनीट), सुनिल बनकर (11 तास 28 मिनीट), राजेश पालवे (11 तास 52 मिनीट) यांनी सदर वेळेत ही मॅरेथॉन पुर्ण केली. या मॅरेथॉनसाठी त्यांना संदिप जोशी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. जोशी देखील प्रशिक्षक म्हणून या मॅरेथॉनसाठी रनर्सबरोबर उपस्थित होते.


या मॅरेथॉन स्पर्धेला वैभवशाली इतिहास असून, 1921 मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. दरवर्षी ही स्पर्धा पहिल्या महायुध्दातील सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात येते. या मॅरेथॉनचे हे 95 वे वर्ष होते. यामध्ये संपूर्ण जगातून 16 हजार, भारतातून 211 तर अहमदनगर शहरातून 4 रनर्स सहभागी झाले होते.

शहरातील चारही रनर्सचे मागील दहा महिन्यापासून जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरु होता. ही स्पर्धा पुर्ण करुन नगरच्या रनर्सनी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी चारही रनर्स व प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले. तसेच एसपीजे स्पोर्टस क्लब व नगर रायझिंगचे विश्‍वस्त व सदस्यांनी रनर्सना शुभेच्छा संदेश पाठविले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन जगातील सर्वात अवघड मॅरेथॉन मानली जाते. पीटरमार्टित्झबर्ग ते डर्बन या दोन शहरातील 90 किलोमीटरच्या अंतरात जवळपास 1500 मीटरहून अधिक उंचीच्या पाच मोठ्या आणि सात छोट्या डोंगररांगामधून जाते. 12 तासात ही स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान धावपटूंपुढे असते. वेळोवेळी तापमानात होणारी घट व वाढ ही रनर्सला आव्हानात्मक ठरते. या मॅरेथॉनला पीटरमार्टित्झबर्ग येथून सकाळी 6 अंश डिग्री तापमानात रनला सुरुवात झाली, दुपारी 25 अंश डिग्रीपर्यंत वाढलेले तापमान तर शेवटी 8 अंश डिग्रीपर्यंत कमी होत चाललेल्या तापमानाचा मोठा प्रभाव खेळाडूंवर जाणवत होता.

भारतीय रनर्सना प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी यांची नात इला गांधी यांची हजेरी प्रमुख आकर्षण ठरली. इला गांधी यांनी तिरंगा ध्वज घेऊन भारतीय रनर्सना शुभेच्छा दिल्या. विशेष गोष्ट म्हणजे ज्या शहरात वर्ण द्वेषातून महात्मा गांधी यांना रेल्वेतून बाहेर काढले होते. त्याच शहरात डर्बन येथे या मॅरेथॉनचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *