शिक्षक परिषदेचे शिक्षण संचालकांना निवेदन
पोषण आहार व विद्यार्थ्यांना शिकविणे ही कामे एकाच वेळी पार पडणे शिक्षकांना अडचणीचे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरी विभाग प्रमाणे ग्रामीण विभागातील शाळांना केंद्रित स्वयंपाक गृहामार्फत आहाराचा पुरवठा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण संचालकांना दिल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
ग्रामीण भागातील शाळेमध्ये आहार शिजविण्याच्या कामावर नियंत्रण ठेवणे, धान्य मालाचा हिशोब ठेवणे, धान्याची साठवणुक व स्वच्छता, इंधन व भाजीपाला खरेदी, आहार शिजवल्यानंतर आहाराचे विद्यार्थ्यांना योग्यरीत्या वाटप होण्याचा दृष्टीने नियंत्रण व व्यवस्थापन इत्यादी गैरशैक्षणिक कामांमध्ये शिक्षकांचा अत्याधिक वेळ खर्च होतो. सदर बाबींचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिकविण्यावर होऊ नये, असे सुद्धा अपेक्षित असते. सदरील शालेय पोषण आहारसंबंधी कामे पार पाडणे व विद्यार्थ्यांना शिकविणे ही दोन्ही कामे शाळा सुरू असल्याच्या कालावधीत एकाच वेळी पार पडणे शिक्षकांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे शहरी विभाग प्रमाणे ग्रामीण भागातील शाळांकरितासुद्धा केंद्रीय स्वयंपाक गृहातून आहार प्राप्त होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या दृष्टीने शिक्षक परिषदेने शिक्षण संचालकांना प्रस्ताव सादर केला असून, ग्रामीण विभागातील शाळांना केंद्रीय स्वयंपाक गृहामार्फत आहाराचा पुरवठा करण्याबाबतचा आदेश निर्गमित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवानअप्पा साळुंखे, मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, सुमन हिरे, प्रा.सुनिल पंडित आदी राज्य कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.